रुग्णालयातील बिलांच्या तक्रारी सोडविण्यासाठी ‘अधिकारी’…

बिलांच्या तक्रारी सोडविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त

   सोलापूर, दि. 7 – कोविड आणि नॉन कोविड रुग्णालयातील बिलांच्या तक्रारी सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांची नियंत्रण अधिकारी म्हणून आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे.

  आदेशात त्यांनी नमूद केले आहे की, कोविड विषाणूबाबतची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी आयडीएसपी पोर्टल आणि पुणे विभागीय आयुक्त यांच्या पोर्टलवर माहिती अपलोड करण्यासाठी ही नियुक्ती करण्यात येत आहे. त्यांनी खालील कामे करणे अपेक्षित असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. आयडीएसपी पोर्टल दैनंदिन अद्ययावत करणे, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार 80 टक्के आणि 20 टक्के बेडवर नियंत्रण ठेवणे, रुग्णाच्या डिस्चार्जपूर्वी बिलाचे लेखापरीक्षकाकडून तपासणी होते का हे पाहणे,  नॅान कोविड रुग्णांच्या बिलांच्या तक्रारी सोडविणे,  ग्रामीण क्षेत्रासाठीचा ऑनलाईन बेड ॲव्हॅलिबिलिटी डॅशबोर्ड रिअल टाईम बेसीसवर अद्ययावत ठेवणे, सीसीसी, डीसीएचसी, डीसीएचबाबतीतील सर्व आदेशांचे पालन करून घेणे, या बाबतच्या सर्व सुविधा तयार करून घेणे, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत समन्वय साधून कोविड रूग्णांना योग्य उपचार मिळेल यांची सुविधा निर्माण करणे, महात्मा  जोतिबा फुले जनआरोग्य योजनेची नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देणे.