सोलापूर राज्य शासनाकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी त्यांनी आज अक्कलकोट, मोहोळ तालुक्यातील गावांना भेटी दिल्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना आधार दिला. राज्य शासन नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिल, असेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री भरणे यांनी आज अक्कलकोट तालुक्यातील शिरसी आणि रामपूर गावातील नुकसानीची पाहणी केली. शिरसी येथे त्यांनी पावसाने वाहून गेलेल्या बांध आणि पडलेल्या घरांची पाहणी केली. त्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील नुकसान झालेल्या सर्व गावांत तत्काळ पंचनामे करण्यात यावेत, अशा सूचना दिल्या आहेत. शेती, घरे, जनावरे यांच्या बाबतीतील पंचनामे संवेदनशीलरित्या करण्यासाठी महसूल, कृषी विभागाला सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पंचनामे झाल्यावर राज्य शासनाकडून मदतीसाठी प्रस्ताव पाठवला जाईल. शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील.
 
  
  
 
महावितरणला अतिशय गतीने काम करुन वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार सिध्दराम म्हेत्रे, उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे, तहसीलदार अंजली मरोड आदी उपस्थित होते.


Leave a Reply