Latest Post

Importance Involving Management In Online Roulett Mostbet Casino, Mostbet, Mosbet, Mostbet Bd, Mostbet Casino In Bangladesh Mostbet On-line Betting, Mostbet Bookmaker Line, Mostbet Terme Conseillé Bonuses, 34

उस्मानाबाद :- जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान वझालेले दिसून येत आहे. अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची दैनंदिन माहिती प्रशासनाकडून घेतच होतो. परंतु आज येथील शेतकरी बांधवांना भेटून त्यांना दिलासा दिला आहे. तरी शेतकऱ्यांनी धीर धरावा शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून शेतकऱ्यांना समाधान मदत देण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच घेण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुळजापूर शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबत च्या आढावा बैठकीत केले.

या बैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मृद व जलसंधारण मंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख, फलोत्पादन व रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भूमरे, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, जिल्हा परिषद चे अध्यक्ष अस्मिता कांबळे, आमदार सर्वश्री ज्ञानराज चौगुले, राणाजगजितसिंह पाटील, कैलास घाडगे -पाटील, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक केएम मल्लिकार्जुन प्रसन्ना, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे यांच्यासह जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकर मदत देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत पोहोचली पाहिजे. त्यासाठी प्रशासनाने शासनाकडे सर्व प्रस्ताव त्वरित पाठवावेत. शासनाकडून शेतकऱ्यांना समाधानकारक दिलासा देऊन लवकरच सर्व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसायचे आहेत, असे त्यांनी सांगितले.
मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाने दीर्घकालीन उपाययोजना सुचवाव्यात व त्याबाबतचा जिल्हा आराखडा तात्काळ सादर करावा तसेच हा आराखडा करत असताना त्यात कोणत्या कामाला प्राधान्य द्यावे त्याचाही काम निहाय क्रम कामनिहाय क्रम ठरवून घ्यावा. मराठवाड्याच्या लातूर उस्मानाबाद हा भाग भूकंपप्रवण आहे त्या शक्यतेचा विचार करून प्रशासनाकडून पुढील काळात या भागात कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती आल्यास त्यावरील उपाय योजना सुचवाव्यात असे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.
संपूर्ण राज्यात पावसाचा पॅटर्न बदलत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे कोणत्या ठिकाणी कसा पाऊस पडून त्याचे आपत्तीत रूपांतर होईल याचा अंदाज बांधता येत नाही. काटगाव तालुका तुळजापूर येथील पुलावरून आठ ते दहा फूट इतके पाणी गेले त्यामुळे या भागातील पिकांची मोठी हानी झाली असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे यांनी येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी पुढील काळात ठेवावी लागेल असेही सांगितले.
सोयाबीन गंजी च्या नुकसानीबाबत विमा कंपनीकडून विमा संरक्षण मिळण्याबाबत योग्य तो निर्णय लवकरच घेण्यात येईल. तसेच जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टी व या पुराच्या काळात जिल्ह्यातील 128 नागरिकांचे प्राण वाचून जीवित हानी होऊ दिली नाही त्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे कामाचे तसेच नुकसानीच्या पंचनाम्याचे काम चांगले सुरू असल्याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांनी कौतुक केले.
राज्यातील मंदिरे खुली करण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ. परंतु सध्याच्या परिस्थितीत कोविड चा प्रसार होऊ नये यासाठी मंदिरे सुरू केलेली नाहीत. एकाच वेळी सर्व गोष्टी सुरू केल्याने परदेशांमध्ये कोविडची पुन्हा मोठी लाट आलेली दिसून येत आहे. तसेच सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असून त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी माझे कुटुंबाची जबाबदारी मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन कोविड चा प्रतिबंध करावा, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.

यावेळी महसूल मंत्री थोरात यांनी अतिवृष्टीने सोयाबीन तूर ऊस कांदा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पुरामुळे जमिनीही खरडून गेलेल्या आहेत. तरी शासनाकडून शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. फलोत्पादन मंत्री भुमरे यांनी अतिवृष्टीने व पुरामुळे विहिरीमध्ये गाळ साठलेल्या ठिकाणी रोजगार हमी योजनेतून तो गाळ काढता येईल असे सांगितले तसेच रोहियो तुन पाणंद व शेत रस्ते घेता येतील असेही त्यांनी सूचित केले.
पालकमंत्री शंकराव गडाख यांनी उस्मानाबाद जिल्ह्यतील 3 लाख 74 हजार हेक्‍टर क्षेत्रावर सोयाबीन हे पीक होते व अतिवृष्टीने या पिकाचे प्रचंड नुकसान झालेले असून आतापर्यंत 50 ते 60 टक्के नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती दिली. तसेच जिल्ह्यातील लघु, मध्यम व मोठ्या प्रकल्पाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्याच्या दुरुस्तीसाठी जवळपास 50 ते 60 कोटी खर्च येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर,आमदार राणाजगजितसिंह सिंह पाटील यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडून त्या सोडविण्याची मागणी केली तर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनीही मराठवाड्यातील पाटील जिल्ह्यातील अतिवृष्टी व पंचनाम्याची माहिती सादर केली.
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी ची माहिती देऊन ऑक्टोबर महिन्यात दोनशे मिलिमीटर पाऊस झाल्याचे सांगितले. अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील एक लाख 56 हजार हेक्‍टर क्षेत्र बाधित झाल्याची प्राथमिक माहिती असून प्रशासन आतापर्यंत एक लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहचून पंचनामे पूर्ण केलेले आहेत उर्वरित पंचनामे पूर्ण करण्याची कार्यवाही वेगाने सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रारंभी उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीच्या काळात वीज पडून दोन नागरिकांचे प्राण गेले त्यामुळे प्रशासनाकडून त्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात मदतीचे धनादेश देण्यात आले.

*काटगाव तालुका तुळजापूर येथील पीक नुकसानीची पाहणी*
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील पीक नुकसान या पाहणी ची सुरुवात काटगाव तालुका तुळजापूर येथील शेती पिकाच्या नुकसानीची पाहणी करून झाली. यावेळी येथील पुलावरून आठ ते दहा फूट पाणी गेल्याची माहिती शेतकऱ्यांनी देऊन यामुळे सोयाबीन, ऊस व द्राक्ष या पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचे सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी येथील शेतकऱ्यांना धीर दिला व शासन सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी असून या नुकसानीबाबत लवकरच मदत देणार असल्याचे सांगितले यावेळी हरिदास माळी व इतर शेतकर्‍यांची मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. तसेच काटगाव ग्रामस्थांची भेट घेऊन आज येथे तुम्हाला भेटण्यासाठी व या आपत्तीच्या परिस्थितीत दिलासा देण्यासाठी आलो असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. तसेच यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी कात्री अपसिंगा तालुका तुळजापूर या गावास भेट देऊन तेथील पीक नुकसानीची पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *