पीक कर्ज वाटपासाठी योग्य नियोजन करा : पालकमंत्री    

BIG 9 NEWS NETWORK

सोलापूर, दि. 11: राष्ट्रीयकृत बँकांनी पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करा, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे दिल्या.

पालकमंत्री भरणे यांनी खरीप पीक कर्ज वाटपाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीयकृत बँक प्रतिनिधींची बैठक घेतली. यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. नियोजन भवनच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, बँक ऑफ इंडियाचे  विभागीय व्यवस्थापक अजय कडू ,जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने आदी उपस्थित होते.

यंदा पाऊस चांगला झाला आहे. त्यामुळे पीक कर्जाची मागणी वाढण्याची शक्यता आहे. ही शक्यता आणि कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करून खरीप पीक कर्जाचे जास्तीत जास्त वितरण होईल यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करावेत. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या मदतीची अथवा काही समस्या असल्यास त्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाची मदत घ्यावी, असे श्री.भरणे यांनी सांगितले.

भोळे यांनी जिल्ह्यातील पीक कर्जाचे उद्दिष्ट आणि आतापर्यंत झालेले वितरण याबाबत माहिती दिली. श्री कडू यांनी सर्व बँका पीक कर्जाचे उद्दीष्ट पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करतील. कोरोना कालावधीत बँकीग कामकाजावर परिणाम झाला होता. आता सुधारणा होईल, असे सांगितले.

प्रस्ताव 15 जुलैपर्यंत सादर करा

जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून करावयाच्या विकासकामांचे प्रस्ताव 15 जुलैपर्यंत सादर करावेत, अशा सूचना पालकमंत्री भरणे यांनी दिल्या. जिल्हा वार्षिक योजनेतून करावयाच्या खर्चाचा आढावा बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीस जिल्ह्यातील सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा वार्षिक योजना अनुसूचित जाती उपयोजना आणि अनुसूचित जमाती योजनेमधील खर्चाचा आढावा घेण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, सहाय्यक नियोजन अधिकारी दिलीप पवार, सहाय्यक आयुक्त कैलास आढे, प्रकल्प संचालक शुभांगी कांबळे आदी अधिकारी उपस्थित होते.