भाजपा व्यापारी आघाडीतर्फे राम रेड्डी यांचा सन्मान

Big9news Network

जागतिक स्तरावरील उत्कृष्ट कारखान्यांच्या यादीत बालाजी अमाईन्सने स्थान मिळविल्याबद्दल व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांचा सत्कार भाजपा व्यापारी आघाडीतर्फे करण्यात आला. श्रीकृष्णाची मूर्ती, शाल, पुष्पगुच्छ देऊन बालाई अमाईन्सच्या कार्यालयात हा गौरव समारंभ झाला.

फोर्ब्जने आशिया खंडातील एशिया बेस्ट अंडर अ बिलियन (2021) उत्कृष्ट कारखान्यांची यादी प्रसिद्ध केली. यात भारतीय कंपन्यांच्या यादीत प्रथमच सोलापूरचे नाव आले आहे. या यादीत बालाजी अमाईन्सचे सातव्या क्रमांकावर नाव असून या कंपनीची उलाढाल 10 हजार 652 कोटी रूपये इतकी आहे. या यादीत नाव येणे ही सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब असून त्यानिमित्त व्यापारी आघाडीकडून हा सन्मान केल्याचे भाजपा व्यापारी आघाडीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्रीनिवास दायमा, शहराध्यक्ष जयंत होले – पाटील यांनी सांगितले. यावेळी सोलापूरच्या विमानसेवेबाबतही चर्चा झाली. सोलापूरला त्वरीत विमानसेवा सुरू होणे आवश्‍यक आहे.

विमानसेवा सुरू होण्याबाबत भाजप व्यापारी आघाडीने घेतलेली भूमिका मोलाची आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून सोलापूरला विमानसेवा सुरू झाली तर शहर – जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी हे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे असे मत बालाई अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी नगरसेवक नागेश वल्याळ, भाजपा व्यापारी आघाडीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्रीनिवास दायमा, शहराध्यक्ष जयंत होले – पाटील, गोपीकृष्ण वड्डेपल्ली, प्रभाकर गोरंटी, श्रीनिवास जोगी आदी उपस्थित होते.