Big9news Network
सोलापूर शहर व जिल्ह्यातील दिव्यांगजनांना त्वरित पिवळ्या शिधापत्रिका द्याव्यात असा आदेश ना.छगन भुजबळ यांचे ओएसडी यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना दिला असल्याची माहिती माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिली.
अन्न सुरक्षा कायदा आणि अंत्योदय योजनेअंतर्गत दिव्यांगजनांना पिवळी शिधापत्रिका द्यावी असा आदेश असताना सोलापूर शहर व जिल्ह्यातील हजारो दिव्यांग बांधव शिधापत्रिकेपासून वंचित आहेत.त्यासाठी लालबावाटा दिव्यांग श्रमिक संघटना गेल्या वर्षभरापासून संघर्ष करत आहे.परंतु शहर व जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून चालढकल केली जात आहे.त्यामुळे माजी आमदार नरसय्या आडम यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना.छगन भुजबळ यांची तीनवेळा भेट घेऊन दिव्यांगजनांना पिवळी शिधापत्रिका देण्याचा आदेश देण्यासंबंधी तगादा लावला होता.
त्याची दखल घेत ना.भुजबळ यांनी भ्रमणध्वनीवरून सोलापूर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याना पिवळ्या शिधापत्रिका देण्याचा आदेश दिला होता.तरीसुद्धा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी मनावर घेतले नाही.त्यावर पुन्हा एकदा ओएसडी परदेशी यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना पिवळ्या शिधापत्रिका देण्याचे आदेश दिले आहेत.यापूर्वी लालबावाटा दिव्यांग श्रमिक संघटनेच्या वतीने ५८७ दिव्यांग बांधवांनी अर्जाद्वारे पिवळ्या शिधापत्रिकेची मागणी केली आहे.त्यामुळे आता दिव्यांगजनांचा मार्ग सुकर झाला असून लवकरच पिवळ्या शिधापत्रिका मिळण्याची शक्यता आहे.पिवळ्या शिधापत्रिकेसाठी लालबावाटा दिव्यांग श्रमिक संघटनेचे पदाधिकारी बाबूलाल फानिबंद, इलियास सिद्दीकी, आसिफ पठाण,अकील शेख,सुशील गुजले, सुरेखा गडदे,सुनीता अंजिखाने, सलीम शेतसंदी,इब्राहीम मुल्ला,अमिना शेख प्रयत्न करत आहेत.