BIG 9 NEWS NETWORK
भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटीच्या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी 30 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त कैलास आढे यांनी केले आहे.
कोविड-19 विषाणूच्या संसर्गामुळे काही महाविद्यालय बंद आहेत. ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रम शिकवला जात आहे, त्यामुळे विद्यार्थी महाविद्यालयात उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज सादर केले नाहीत. विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नयेत, म्हणून अद्यापही शिष्यवृत्तीचे अर्ज भरलेले नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे.
राज्यातील विविध महाविद्यालयामध्ये 2021-22 मध्ये प्रवेश घेतेलेले आणि शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज तत्काळ https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन सादर करावेत. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी महाविद्यालयस्तरावर याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी. महाविद्यालयांनी महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असणारे अर्ज लवकरात लवकर ऑनलाईन प्रणालीतून सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे वर्ग करावेत, असे आवाहन श्री. आढे यांनी केले आहे.
Leave a Reply