उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नित्यानंद स्वामी यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची आदरांजली

Big9News Network

नित्यानंद स्वामी फार कमी काळ उत्तराखंडचे मुख्यमंत्री राहिले, मात्र त्या अल्पकाळात देखील त्यांनी मंत्री या नात्याने आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले. टेहरी गढवाल प्रकल्प पूर्ण करताना असंख्य अडचणी आल्या, परंतु त्यांनी आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य दिल्यामुळेच अशक्य वाटत असलेला तो प्रकल्प पूर्ण होऊ शकला, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

उत्तराखंड राज्य स्थापनेला २१ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून ‘अपणू उत्तराखण्ड’ या सांस्कृतिक संध्येचे सोमवारी (दि. १५) राजभवन येथे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

श्री नित्यानंद स्वामी जनसेवा समितीतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

दिवंगत नित्यानंद स्वामी यांना आदरांजली वाहून राज्यपाल कोश्यारी म्हणाले, उत्तराखंडचे प्रथम मुख्यमंत्री दिवंगत नित्यानंद स्वामी हे अतिशय संघर्षशील नेते होते. ते एक यशस्वी वकील तसेच समर्पित समाजसेवक होते. राजकारणात त्यांना मोठी पदे मिळाली, परंतु त्यांनी आपली विनम्रता टिकवून ठेवली असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

यावेळी लोकगायिका पद्मश्री बसंती देवी बिश्त यांनी लोकगीते सादर केली. विकास भारद्वाज, सृष्टी काला, व अमन रातुडी यांनी देखील गीते सादर केली.  राज्यपालांच्या हस्ते यावेळी सर्व सहभागी कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

समितीचे अध्यक्ष आर के बक्षी, उपाध्यक्ष ज्योत्स्ना शर्मा व विनायक शर्मा स्वामी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाला चित्रपट सृष्टीतील शायना एन सी, हिमानी शिवपुरी, चित्राक्षी तिवारी, श्रुती पंवर व दीपक दोब्रीयाल उपस्थित होते.