‘कोरोना काळात डॉक्टरांच्या नोकरीला सेवा का म्हणतात ते समजले’ – अनिरुद्ध कांबळे

Big9news Network

एक जून हा सबंध भारतात डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून सोलापूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून डॉक्टर्स डे च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शितलकुमार जाधव, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी सोनिया बागडे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ अनिरुद्ध पिंपळे, सहसंचालक कृष्ठरोग डॉ.संतोष जोगदंड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शेगर, जिल्हा आयुष अधिकारी डॉ विलास सरवदे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. दळवी, जिल्हा लेखा व्यवस्थापक वैशाली थोरात आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना कांबळे म्हणाले की दुसऱ्या लाटेमध्ये परस्थिती हाताबाहेर गेली होती. हॉस्पिटल मध्ये बेड मिळत नव्हते. रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा होता. ती भीषण परिस्थिती पाहून आम्ही हतबल झालो होतो परंतु आमची डॉक्टर मंडळी या परिस्थितीत नेटाने लढत होती. रात्री-बेरात्री केव्हाही फोन केला असता फोन उचलला नाही असे कधीच झाले नाही. त्या काळात डॉक्टरांच्या संयमाची अगदी परीक्षा होती आणि त्या परीक्षेत आमची डॉक्टर मंडळी पास झाली. डॉक्टरांच्या नोकरीला का म्हणतात ? ते या काळात समजले.

यावेळी सीईओ स्वामी म्हणाले की मुळात डॉक्टर होणे हे अगदी कष्टाचे काम आहे. प्रचंड अभ्यास करून डॉक्टर झाल्यानंतर जीवन स्थिरस्थावर होण्याऐवजी अस्थिर होते. डॉक्टरांच्या कामाला निश्चित अशी वेळ नसल्यामुळे डॉक्टरांच्या वाट्याला आराम हा अभावानेच येतो. कोविडच्या काळात डॉक्टर मंडळी फक्त आराम विसरूनच नव्हे तर आपला जीव धोक्यात घालून काम करत होती. त्यांच्या साथीला आमचे आरोग्य कर्मचारी खांद्याला खांदा लावून या परिस्थितीचा सामना करत होती आणि करत आहेत. आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांचे हे योगदान समाज कधीच विसरू शकणार नाही.

कोरोनाची सुरूवात झाली तेव्हा सगळेच गोंधळात होते. आजार नवीन होता. उपचारा संबंधीचा प्रोटोकॉल समजून घेऊन या आजाराशी स्वतःला वाचवत रुग्णांचा जीव वाचवायचा होता. पहिल्या लाटे पेक्षा दुसरी लाट अत्यंत तीव्र स्वरूपाची असल्यामुळे मागील तीन महिन्याच्या काळात अनेकदा हाताश झाल्यासारखे वाटत होते परंतु जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी पाठीशी ठामपणे उभे राहिले. या परिस्थितीत त्यांची साथ मोलाची होते. त्याचप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे स्वतः बाधित असतानादेखील दवाखान्यातून त्यांनी काम सुरू ठेवले. दवाखान्यातून आम्हाला त्यांच्याकडून सूचनावजा मार्गदर्शन मिळत होते. आपला कुटुंब प्रमुख एवढा खंबीरपणे या आजाराशी लढतोय म्हटल्यावर आम्हाला खऱ्या अर्थाने हुरूप आला व आमचा हताशपणा कुठल्या कुठे पळून गेला ते कळलेच नाही. असे यावेळी बोलताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शितलकुमार जाधव म्हणाले.

यावेळी सर्व तालुका आरोग्य अधिकारी व निवडक वैद्यकीय अधिकारी यांचा प्रातिनिधिक स्वरूपात जास्वंद व पारिजातकाचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. एक पद एक वृक्ष या मोहिमेअंतर्गत मिळालेले रोप प्रत्येकाने लावावे व त्याची जोपासना करावी असे आवाहन यावेळी. डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी केले. याप्रसंगी मोनाली खैरमोडे यांनी एक गीत सादर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी केले. याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी पंढरपूर डॉ. एकनाथ बोधले, जिल्हा आयुष अधिकारी डॉ विलास सरवदे यांनी आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार डॉ. दळवी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक यांनी मानले.