- Big9news Network
वाचन आणि लिखाणामुळेच मानवाचा विकास झाला आहे. वाचनाच्या प्रेरणेमुळेच मानवाने प्रगल्भ बनून प्रगती केली आहे, मात्र सध्या तंत्रज्ञानाच्या प्रचंड वापरामुळे वाचन व लिखाण संस्कृती लोप पावत चालली आहे. भविष्यासाठी ही बाब धोकादायक आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांमध्ये ‘वाचनकट्टा’ संस्कृती रुजवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी केले.
सोमवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात ज्ञानस्त्रोत केंद्राच्यावतीने माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून चवरे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेश पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. गौतम कांबळे यांनी केले.
चवरे म्हणाले की, समाजाचा विकास वाचनामुळे झालेला आहे. वाचन क्षेत्र फार मोठे आहे, मात्र अलीकडे परिघाबाहेर जाऊन वाचन करण्याची संस्कृती कमी होत चालली आहे. विद्यार्थी, शिक्षक, संशोधकांनी इतर क्षेत्राचे ही वाचन करावे. आज तंत्रज्ञानाच्या विविध माध्यमांमुळे विचार करण्याची क्षमता कमी झाली आहे. वाचन लिखाणाच्या सवयीचा ऱ्हास होत चाललेला आहे. वास्तविक वाचनाने दृष्टी निर्माण होते. शाळा-महाविद्यालयांमध्ये वाचनकट्टा संस्कृती रुजवण्याची गरज आहे. वाचन लिखाण कमी झाल्यास पुढील दहा वर्षात त्याचे वाईट परिणाम दिसून येतील, अशी भीतीही चवरे यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या की, वाचन संस्कृती रुजविण्यासाठी व ग्रंथालय समृद्ध करण्यासाठी विद्यापीठातर्फे एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये ग्रंथालयात पाच-पाच विद्यार्थ्यांना बोलावून त्यांना वाचन करण्याची संधी दिली. ठराविक वेळेत वाचन झाल्यानंतर त्यांच्याकडून अभिप्राय लिहून घेण्यात आले. यामुळे या विद्यार्थ्यांना वाचनाची व लिखाणाची एक चांगली सवय लागली. त्याचबरोबर वाचन संस्कृती व चळवळ वाढवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. फिरती ग्रंथशाळा हा ही एक चांगला उपक्रम वाटतो, असा विश्वासही कुलगुरू डॉ. फडणवीस त्यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली यांनी केले तर आभार डॉ. पल्लवी सावंत यांनी मानले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेश पवार व ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. गौतम कांबळे.