Big9news Network
या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणूनही ओळखले जाते. विघ्न म्हणजे कार्यात बाधा येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा. देऊळ लेण्याद्रीपासून २० किमी आणि ४५ मिनिटांच्या अंतरावर आहे. येथे गणपतीने विघ्नासुर राक्षसाला पराभूत केले म्हणून त्याला विघ्नेश्वर असे
म्हणतात.
- श्री क्षेत्र विघ्नेश्वराची कथा :
राजा अभिनंदनने त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ सूरू केला.
यामुळे भयभीत झालेल्या इंद्राने या यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर राक्षसाची उत्पत्ती केली. त्यामुळे संतप्त झालेल्या इंद्राने विघ्नासुराला तिथे विध्वंस करण्यास आणि यज्ञ बंद पडण्यासाठी धाडले. विघ्नासुराने यज्ञामध्ये बाधा तर टाकलीच शिवाय त्याने विश्वामध्ये अनेक विघ्ने निर्माण केली. म्हणून मग पृथ्वीतळावरील लोक ब्रम्हदेव आणि शंकर यांच्याकडे गेले. त्या दोघांनी त्यांना गणपतीकडे मदतीची याचना करण्यास सांगितले. यामळे ऋषीमूनींनी विघ्नासूराचा बंदोवस्त करण्याची गणपतीला विनंती केली. समस्त लोकांनी गणपतीची अराधाना केली आणि त्यांच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन गणपती पराशर ऋषींचा पुत्र म्हणून अवतीर्ण झाला आणि विघ्नासुरा बरोबर घनघोर युद्ध करून गणपतीने त्याचा पराभव केला. गणपतीने पराभव केल्यानंतर विघ्नासूर गणपतीला शरण गेला. गणपतीने त्याला जेथे माझी पूजा केली जाते तेथे न येण्याच्या अटीवर सोडून दिले. विघ्नासूराने गणपतीला विनंती केली की तुमचे नाव घेण्याआधी माझे नाव भक्तगणांती घ्यावे व तुम्ही येथेचे वास्तव्य करावे.
विघ्नासूराची ही विनंती गणपतीने मान्य केली व तो या ठिकाणी विघ्नहर या नावाने वास्तव्य करू लागला.
यामुळे लोक अतिशय आनंदित झाले आणि त्यांनी इथे विघ्नेश्वराची स्थापना केली.
- श्री क्षेत्र विघ्नेश्वर मंदिर आणि परिसर :
या मंदिराच्या प्रवेशद्वारावर चार द्वारपाल आहेत. पहिल्या आणि चौथ्या द्वारपालाच्या हातात शिवलिंग आहे. गणपती त्याचे माता आणि पिता यांचा अतिशय आदर करतो. या द्वारपालांच्या हातातील शिवलिंग हेच सूचित करते की गणपतीच्या भक्तांनीसुद्धा स्वतःच्या आईवडिलांचा आदर राखला पाहिजे. देवळाच्या भिंतींवर डोळ्यांना सुखावह वाटणारी सुंदर चित्रे आणि शिल्पे आहेत. देऊळ पूर्वाभिमुख असून त्याच्या सभोवती भक्कम दगडी भिंत आहे. मंदिराचे शिखर आणि कळस सोनेरी आहेत. विघ्नहराच्या मंदिराच्या पुढे २० फुट लांब सभागृह असून आतील गाभारा १० बाय १० फुटाचा आहे. मंदिराच्या कडेने मजबूत संरक्षक भिंत आहे. पूर्वाभिमुख गणपतीची सोंड डावीकडे आहे आणि त्याचे डोळे माणिकाचे आहे. रिद्धी आणि सिद्धी यांच्या मुर्त्या गणपतीच्या आजूबाजूला आहेत. गणपतीच्या मुर्तीच्यावर शेषनाग आणि वास्तुपुरुष आहेत. देवळात लहान लहान खोल्या आहेत. यांना ओवऱ्या म्हणतात. इथे बसून भक्त ध्यान करू शकतात.
येथील पूर्वाभिमुख मूर्तीच्या कपाळावर नाभीवर हिरे आहेत.
१७८५ मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी आप्पा यांनी हे देऊळ बांधून त्यावर सोनेरी कळस चढविला.
- पूजा आणि उत्सव : :
उपलब्ध माहितीनुसार दर्शनाची वेळ सकाळी ५ ते रात्री ११. अंगारकी चतुर्थीला सकाळी ४ पासून रात्री ११ पर्यंत. महाआरती सकाळी ७.३०, मध्यान्न आरती दुपारी १२ आणि शेजआरती रात्री १० वाजता असते. महाप्रसाद सकाळी १०, दुपारी १ आणि संध्याकाळी ७.३० ते १०.३०.
भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यात गणेश जयंती यादिवशी उत्सव साजरे केले जातात. कार्तिक पौर्णिमेला दीपमाळांची रोषणाई बघण्यासारखी असते. तसेच त्रिपुरी पौर्णिमेला येथे चार दिवस मोठा उत्सव साजरा केला जातो.
- जाण्याचा मार्ग :
पुणे नाशिक रस्त्यावर पुण्यापासून ८५ किलोमीटरवर ओझर हे गाव आहे.
- जवळची इतर दर्शनीय स्थळे : :
भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग. अंतर अंदाजे ७८ किमी
आर्वी हे उपग्रह केंद्र. अंतर अंदाजे १३ किमी
खोडद येथे आशिया खंडातील सर्वात मोठी आकाश दुर्बीण बसविलेली आहे. अंतर अंदाजे २१ किमी
संत ज्ञानेश्वर यांनी ज्या रेड्याच्या तोंडून वेद वदवून घेतले त्या रेड्याची समाधी आळे येथे आहे. अंतर अंदाजे २७ किमी
||गणपती बाप्पा मोरया||
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व गणेश भक्तांना नम्र विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वंताची प्रसिध्दी करु नये.
All Rights Reserved
© ✍ लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.
संग्रहित दिनांक : २५ सप्टेंबर २०१५
॥ ॐ नम: शिवाय, ॐ नमो नारायण ॥
॥ जय श्रीराम, जय श्रीकृष्ण….॥
Leave a Reply