Big9news Network
महेश हणमे /9890440480
अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने सोलापूर शहरात काय सुरू, काय बंद यासंदर्भात काल म्हणजेच शनिवारी संध्याकाळी आदेश लागू केले. परंतु, त्या आदेशात पूजा साहित्य आणि फुलांची दुकाने यासंदर्भात कोणताच उल्लेख नव्हता. त्यामुळे नागरिक, दुकानदार यांच्यामध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले होते.
याबाबत आज पूजासाहित्य, फुलांची दुकाने सुरू राहतील अशी माहिती महापालिकेचे सहाय्यक आयुक्त विजय खोराटे यांनी MH 13 न्यूजला बोलताना दिली.
दरम्यान, शिवसेनेचे शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, परिवहन सदस्य विजय पुकाळे, यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनेने महापालिका प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली. तेव्हा प्रशासन प्रमुख महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी पोलीस विभागाला याबाबत सूचना देण्यात येतील आणि दुकाने सुरू राहतील असे सांगितले.
आज सकाळी महापालिका सहाय्यक आयुक्त विजय खोराटे यांच्याशी विशेष प्रतिनिधीने संवाद साधला असता अनंतचतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील पूजा साहित्य, फुलांची दुकाने सुरू राहतील. फळ, दूध हे अत्यावश्यक सेवेमध्ये येत आहेत त्यामुळे ही दुकाने सुरूच आहेत असेही त्यांनी सांगितले.
नगरसेवक तथा शिवसेनेचे शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर यांनी या बाबत प्रतिक्रिया दिली की.. काल सायंकाळपासून मी महापालिका आयुक्त यांच्याशी संपर्कात आहे. त्यांनी फुलांची दुकाने आणि पूजासाहित्य दुकाने सुरू राहतील असे सांगितले. अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू आहेत परंतु विसर्जना साठी आवश्यक असलेले पूजा साहित्य आणि फुलांची दुकाने बंद का ..? समाज माध्यमातून प्रशासनावर टीकेची झोड उठत आहे. याचीही जाणीव महापालिकेला करून दिली. आज सकाळी महापालिका सहाय्यक आयुक्त विजय खोराटे यांनी आज पूजा साहित्य आणि फुलाची दुकाने सुरू राहतील. त्या संदर्भात आदेश लगेच काढण्यात येतील असे सांगितले.