तीर्थक्षेत्र अक्कलकोटचा केंद्र शासनाच्या प्रशाद योजनेमध्ये समावेश करण्याची मागणी स्वामी भक्तांतून होत आहे.
कोट्यावधी भक्तांचे श्रध्दास्थान श्री स्वामी समर्थांची पावन पुण्यभूमी श्री क्षेत्र अक्कलकोट हे राज्य शासनाच्या तीर्थ क्षेत्रात समावेश असून देश विदेशातून श्रींच्या दर्शंनाला दर गुरूवार, सुट्टीचा दिवस, प्रकट दिन, पुण्यतिथी सोहळा, गुरूपौर्णिमा, श्री दत्त जयंती, दरमहिन्याची पोर्णिमा, संकट चतुर्थी, सण, वार उत्सवा बरोबरच दररोज श्रींच्या दर्शनाकरिता गर्दी होत असते.
श्री क्षेत्र अक्कलकोटला वैश्विक पर्यटण केंद्र म्हणून विकसीत करण्यासाठी व या माध्यमातून या अर्थकरणाला चालणा देण्यासाठी श्री स्वामी समर्थ तीर्थ क्षेत्राचा केंद्र सरकारच्या पर्यंटन मंत्रालया अंतर्गत प्रशाद योजनेमध्ये समावेश करावा. या करिता राज्याच्या नगर विकास विभागाने केंद्राकडे शिफारस करण्याची मागणी स्वामी भक्तांतून जोर धरत आहे.
श्री क्षेत्र अक्कलकोटला मोठा ऐतिहासिक, धार्मिक व पर्यटण स्थळाचा गौरवशाली वारसा लाभलेला आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे जीवनमान उंचवण्यासाठी व आर्थिक सुबता आणण्यासाठी पर्यटणाच्या माध्यमातून या भागाचा विकास केल्यास येथील अर्थकारणाला मोठी चालणा मिळणार आहे.
देशाचे पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी, केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाविकांची सोय करण्यासाठी व या भागाच्या विकासाला चालणा देण्यासाठी श्री क्षेत्र अक्कलकोट ते सोलापूर ते गाणगापूर, या मार्गावरील रस्ता विकसीत करण्यात आला आहे. तो रस्ता सोलापूर पर्यंतचा 90 टक्के पूर्ण झालेला आहे. याबरोबरच सुरत, अक्कलकोट, चैन्नई, मुंबई, अक्कलकोट, चैन्नई, तेरा मैल, अक्कलकोट, मराठवाडा मार्गे मध्य व दक्षिणकडे जोडणारा रस्ता, यासह मुंबई ते अक्कलकोट, हैद्राबाद बुलेट ट्रेन अशा महत्वपूर्ण दळणवळणाच्या साधनामुळे तीर्थक्षेत्र अक्कलकोट हे दक्षिण भारताला जोडणारे महाद्वार म्हणून नावारुपास आलेला आहे. यामुळे गेल्या पाच वर्षामध्ये विविध रस्ते कामासह व पुढील पाच वर्षामध्ये श्री क्षेत्र अक्कलकोट व परिसराचा कायापालट निश्चित आहे. या बरोबरच नियोजित विमानतळ व पंचतारिकींत एम.आय.डी.सी. प्रस्ताव देखील या निमित्याने पुढे येत आहे.
पर्यटण क्षेत्राच्या विकासा करिता केंद्र शासनाने प्रशाद नावाची मिशन मोड वरील तीर्थक्षेत्र विकासाची योजना जाहीर केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून पर्यटक वाढीसाठी पायाभूत सुविधांची निर्मिती, रोजगार निर्मिती, पर्यटन क्षेत्राबाबत जागृकता वाढविणे, कौशल्य विकास, पर्यटन वाढविण्यासाठी क्षमता निर्माण करणे, पर्यटकांना मूल्यवर्धीत सेवा पुरविणे, पर्यटण स्थळामध्ये खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढविणे, व एकात्मिक विकास आराखड्याच्या माध्यमातून परिसरातील 10 कि.मी. व त्या पेक्षा अधिक भाग विकासीत करणे याबाबत अंर्तभूत केल्या आहेत. या योजनेला संपूर्णता केंद्र शासनाचे अर्थसहाय्य असून योजनेत समाविष्ठ करण्यासाठी राज्य सरकारची शिफारसीसह विनंती आवश्यक आहे.
श्रीक्षेत्र अक्कलकोटचा या योजनेमध्ये समावेश केल्यास या भागात मोठी गुंतवणूक वाढेल, व औद्योगिक करणाचा अभाव असलेल्या अक्कलकोट तालुक्यात मोठी आर्थिक क्रांती घडणार आहे. त्यामळे केंद्र शासन व राज्य शासन व सी.एस.आर.च्या माध्यमातून तालुक्यातील ऐतिहासिक व धार्मिक पर्यटन स्थळाचा विकास केल्यास तालुक्याचा मानव विकास निर्देशांक व दरडोई उत्पन्नात मोठी भर पडू शकते. या करिता राज्य व केंद्र सरकार देखील सकारात्मक आहे. त्यामुळे श्री स्वामी समर्थ तीर्थक्षेत्राचा प्रशाद योजनेमध्ये समाविष्ठ करण्यासाठी केंद्र सरकारला राज्याच्या नगर विकास, पर्यटन विभाग यांनी शिफारस करण्याची मागणी पुढे येत आहे. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री अदित्य ठाकरे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे सर्व स्वामी भक्त आहेतच. त्यामुळे सदरचा विषय मार्गी लावण्यास अडचण नसून, राज्यातील केंद्रीय मंत्री हे देखील सर्व स्वामी भक्तच आहेत. हे सर्व पाहता तीर्थक्षेत्र अक्कलकोटचा केंद्र शासनाच्या प्रशाद योजनेमध्ये समावेश करण्याची मागणी स्वामी भक्तांतून होत आहे.
राज्याच्या पर्यटन विकास महामंडळाकडून श्री क्षेत्र अक्कलकोट करिता म्हाडा कॉलनी लगत अद्यावत स्वरूपात गेस्ट हॉऊस व रेस्टारेंटची उभारणी केलेली आहे. अद्याप त्याचा भक्तापर्ण कार्यक्रम झालेला नसून, शहरातील विभागातून महामंडळाची घेतलेली कामे अर्धवट असून, ती तात्काळ पूर्ण करण्याची मागणी देखील पुढे येत आहे.