Big9news Network
डॉक्टरी पेशा हा केवळ व्यवसायासाठी नसून सामाजिक बांधिलकीही जपली पाहिजे या उद्देशाने डॉ. विक्रम दबडे यांनी अथक प्रयत्न करून सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील हिमोफिलीया रुग्णांसाठी मोफत उपचार करण्यासाठी दत्त चौकातील वरद बाल रुग्णालयात सेंटर सुरू केले असल्याचे प्रतिपादन इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मिलिंद शहा यांनी केले. मोफत हिमोफिलीया उपचार सेंटरचे उद्धाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सुनिल हिलालपुरे, डॉ. सुनिल लोहाडे (पुणे), डॉ. सावस्कर, डॉ.वैशंपायन वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाचे डॉ. प्रसाद, डॉ. यजुर्वेदी, डॉ. राऊत, डॉ. अतुल झंवर, डॉ. माधुरी दबडे, डॉ. वैशाली दबडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील हिमोफिलीया रुग्णांना उपचारासाठी मुंबई, पुणे किंवा कर्नाटक आंध्र प्रदेशातील विविध हॉस्पिटलला जावे लागत होते. त्यासाठी पैसा आणि वेळ मोठ्याप्रमाणात खर्च होत होता तो आता डॉ. विक्रम दबडे यांच्यामुळे होणार नाही नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले दबडे परिवाराने हेमोफेलिया रुग्णांसाठी उपचार केंद्र सुरू करून सोलापूरकरांची मोफत सोय करून सेवा केली आहे. असेही डॉ. मिलिंद शहा यांनी सांगितले.
प्रारंभी डॉ. विक्रम दबडे यांनी हिमोफिलीया या रोगाबाबत माहिती दिली आणि त्यासाठी रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना कसा त्रास होत होता याची सविस्तर माहिती दिली सोलापूरमध्ये दत्त चौकातील वरद बाल रुग्णालयात एचटीसी म्हणजेच हिमोफिलीया ट्रान्सफ्युजन सेंटर सुरू केले असून सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णावर मोफत आणि तातडीने उपचार करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.
या सेंटरसाठी हिमोफिलीया फेडरेशन ऑफ इंडिया, जागतिक हिमोफिलीया फेडरेशन, महाराष्ट्र हिमोफिलीया सोसायटी पुणे यांच्याकडून मोलाचे सहकार्य लाभले आहे हिमोफिलीया रूग्णांना फॅक्टर 8 आणि 9 दिल्याने रक्तस्त्राव लगेच थांबतो आणि प्राण वाचवता येते. सोलापूर जिल्ह्यातील 150 रूग्णांना फॅक्टर घेण्यासाठी पुण्याला जावे लागत होते परंतु वदर बाल रुग्णालयात ही सोय मोफत झाली आहे त्यामुळे रुग्णांचा वेळ, पैसा आणि जीव वाचवण्यासाठी मोठी मदत झाली आहे असेही डॉ. विक्रम दबडे यांनी सांगितले. याचा सोलापूर शहर जिल्ह्यातील हिमोफिलीया रुग्णांनी लाभ घेवून आपले प्राण वाचवावेत असे आवाहनही यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाला पुण्याच्या सह्याद्री केंद्राचे मानसी नेने, डॉ.आदिती जोशी, दिप्ती खेडकर, विरेंद्र चौधरी, विलास चव्हाण, मनोज मिसाळ यांच्यासह सर्व टिम उपस्थित होती तर या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हिमोफिलीया झालेली रुग्ण लक्ष्मी साळुंखे हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.