Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9 News

मद्रे येथे विविध विकास कामांचे लोकार्पण 

राज्यात भाजप शिवसेनेचे सरकार आले आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या तसेच सर्वसामान्यांच्या पाठीमागे उभे राहणारे आहे. आपले सरकार आल्यापासून आठ ते नऊ महिन्यात दक्षिण मतदार संघाला तब्बल 250 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. या पुढील काळात आणखी निधी आपण सरकारकडून खेचून आणू, असे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी केले.

मद्रे येथे विविध विकास कामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, बाजार समितीचे संचालक अप्पासाहेब पाटील-वडकबाळकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डॉ. चनगोंडा हविनाळे, सरपंच स्वाती माने आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सुभाष देशमुख म्हणाले की, राज्यात अडीच वर्षे सरकार महाविकास आघाडीचे होते त्यावेळेस दक्षिण मतदार संघाला केवळ दोन ते तीन कोटींचा निधी मिळाला. मात्र त्यानंतर ज्यावेळी भाजप शिवसेनेचे सरकार आले त्यावेळेस निधी मिळण्यास सुरुवात झाली. दक्षिण मतदार संघात आत्तापर्यंत 250 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. यापुढे आणखीही निधी मिळणार आहे दक्षिण तालुक्यातील प्रत्येक गावाला कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे काही गावांना तर 25 कोटींपेक्षा जास्त निधी मिळाला आहे. राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी विकास कामाला सढळ हाताने निधी देतात. त्यामुळे हे शक्य झाल्याचे आमदार देशमुख म्हणाले.

यावेळी हणमंतराव कुलकर्णी,अतुल गायकवाड, गौरीशंकर मेंडगुदले, उपअभियंता प्रशांत महाजन, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब माने, दिपाली व्हनमाने, अप्पासाहेब मोटे, सदाशिव व्हनमाने, सुखदेव गावडे, समाधन घंटे, साहेबलाल हवालदार, भिमाशंकर पाटील,जगदेव व्हनमाने, शिवाजी पांढरे, पोलीस पाटील अनिल हक्के, श्रीशैल व्हनमाने यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आप्पासाहेब मोटे यांनी तर आभार प्रदर्शन सरपंच स्वाती माने यांनी केले. सूत्रसंचालन सदाशिव व्हनमाने यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *