मंगळवेढा | टेम्पोची-कारची धडक; ३ ठार, चौघे जखमी

Big9news Network

चुकीच्या दिशेने आलेल्या आयशर टेम्पोच्या धडकेने कारमधील तिघे ठार, तर चौघे जखमी झाले. शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास मंगळवेढा-सोलापूर रोडवरील ब्रम्हपुरी शिवारात दामाजी कारखाना पाटीजवळ हा भीषण अपघात झाला. जैनुद्दिन काशीम यादगिरे (वय ३५), साजिद हारून (वय ३५. दोघेही रा. उमदी, ता. जत, जि. सांगली) हे दोघे जागीच ठार झाले, तर कारचालक कमलेश ऊर्फ प्रवीण रुद्राई हिरेमठ (वय २५) याचा उपचारादरम्यान सोलापूरच्या खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

औरंगाबाद येथील इस्तेमाचा कार्यक्रम संपल्यानंतर हे सर्वजण गावी उमदी येथे निघाले होते. आयशर टेम्पोच्या (एमएच ०९ इएम – ४६६०) चालकाविरुद्ध विरोधात मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असिब नबीसाहेब सय्यद (वय २४) यांनी फिर्याद दिली.

उमदी येथील सहा जण इस्तेमासाठी तीन दिवसांपूर्वी औरंगाबादला गेले होते. शनिवारी रात्री ते उमदीकडे परत निघाले. सोलापूरहून मंगळवेढामार्गे जात असताना ब्रम्हपुुरी शिवारात समोरून चुकीच्या दिशेने आलेल्या भरधाव टेम्पोने त्यांच्या इर्टिगा कारला (एमएच १० डीक्यू – ४७६०) जोराची धडक दिली. अपघातानंतर टेम्पोचालक पळून गेला. जैनुद्दिन कासीम यादगिरे, साजिद हारुन खान, कारचालक कमलेश ऊर्फ प्रवीण रुदाई हिरेमठ या तिघांचा मृत्यू झाला. अमीर मुबारक तांबोळी (वय २५), रमजान सिकंदर सय्यद (वय ४०), नबीसाहेब कासीम सय्यद (वय ५०), वहाब अप्पासाहेब मुल्ला (वय ५५, सर्व रा. उमदी) हे गंभीर जखमी झाले. हवालदार निंबाळे तपास करत आहेत.

जैनुद्दिन काशीम यादगिरे व साजिद हारून खान यांचे शवविच्छेदन मंगळवेढा येथे करण्यात आले. उमदी येथे त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. रुग्णालयात मृत्यू झालेल्या कारचालक कमलेश ऊर्फ प्रवीण रुदाई हिरेमट याच्यावर उमदी येथे रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.