Big9news Network
आदिवासीं जनतेच्या वन जमिनी तसेच विविध प्रश्नांसंदर्भात सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी समन्वयाने काम करून आदिवासींचे प्रश्न तात्काळ निकाली काढण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. आदिवासींच्या वन हक्क व इतर अनुषंगिक विषयासंदर्भातील प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना ज्येष्ठ नेते खासदार श्री.शरद पवार यांनी या बैठकीत केल्या.
सह्याद्री अतिथीगृह येथे अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी नागरिकांच्या वन हक्कासंदर्भातील आयोजित बैठकीत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. यावेळी या बैठकीस ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड,ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आदिवासी विकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, राष्ट्रीय आदिवासी किसान ब्रिगेडेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीषदादा पेंदाम यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. वन विभागाचे अधिकारी तसेच अमरावती, गोंदिया, गडचिरोली, पालघर, नंदूरबारचे जिल्हाधिकारी या वेळी दूरदृश्यप्रणालीव्दारे उपस्थित होते.
राज्यमंत्री श्री.दत्तात्रय भरणे म्हणाले, अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी नागरिकांच्या राज्यभरातील वेगवेगळ्या समस्या आहेत. संघटनेने मांडलेल्या मुद्यांवर प्रत्येक जिल्हा प्रशासनाने समन्वय साधून आदिवासींचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे. जमिनी, वन जमिनी या सर्व प्रश्नांबाबत आदिवासी नागरिकांचे म्हणणे ऐकून घ्यावे तसेच नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे. वन विभागाने देखील शासन निर्णयासंदर्भात नागरिकांमध्ये प्रशासनाने जनजागृती करून आदिवासी हितांचे निर्णय घेण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केल्या.
आदिवासींचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे : ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार
ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार म्हणाले, आदिवासींच्या वन हक्क, ग्रामसभा, जमिनी तसेच इतर अनुषंगिक विषयासंदर्भातील अनेक समस्या आहेत. बैठकीत सादर केलेले विषय गांभीर्याने निकाली काढण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचनाही त्यांनी केल्या.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील आदिवासींच्या प्रश्नासंदर्भात संबधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या सचूना केल्या.यावेळी राष्ट्रीय आदिवासी किसान ब्रिगेडेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीषदादा पेंदाम यासह संघटनेचे पदाधिकारी यांनी विविध प्रश्नांसंदर्भात निवेदन सादर केली.
Leave a Reply