सोलापूर जिल्हा परिषदेने 5000 किंवा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून नुकताच घेतला असून अनेक गावात मागील तीन चार दिवसांपासून कोविड केअर सेंटर उभे केलेले आहेत. लक्षणे नसलेल्या व सौम्य कोरोना रूग्णांसाठी गावपातळीवरच उपचाराची सोय व्हावी व शहरातील कोविड हॉस्पिटलवरील भार हलका व्हावा या उद्देशाने या उपक्रमाची जिल्हा परिषद प्रशासनाने सुरुवात केली आहे.
महिला रुग्णांना पुरुष वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांच्याशी त्यांच्या अडचणी व इतर होणारा त्रास बोलणे अडचणीचे होते. त्यातच ग्रामीण भागातील महिलांना याबाबत अधिकच अडचणीचा सामना करावा लागतो. महिला कोरोना रुग्णांची ही अडचण लक्षात घेऊन सीईओ स्वामी यांनी ग्रामीण भागातील सध्या सुरू असलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये महिला रुग्णांच्या आरोग्यसेवेसाठी महिला वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. यापुढे जाऊन गाव तिथे कोविड सेंटर या उपक्रमातील सेंटरमध्ये ही अशा प्रकारचे महिला आरोग्यअधिकारी व आरोग्य कर्मचारी नियुक्तीचे आदेश काढले जाणार आहेत.अशा प्रकारचा नाविन्यपूर्ण प्रयोग करणारी सोलापूर जिल्हा परिषद ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरली आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेने घेतलेल्या या निर्णयाचे ग्रामीण भागातील महिला रुग्णांनी स्वागत केले असून महिला रुग्णां मधून या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.