Breaking | मुहूर्त लागला ,शहर होणार अनलॉक -वाचा सविस्तर

BIG 9 NEWS NETWORK

सोलापूर महापालिकेला स्वतंत्र प्रशासकीय युनिट म्हणून मान्यता देण्यात आली आहे ,तसे पत्र राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्रालयाच्या अवर सचिव यांनी महापालिकेला पाठवले आहे.

काय आहे पत्रात…

या पत्रामध्ये कोरोना विषाणूचा संक्रमणाची साखळी खंडित करण्याच्या व त्याचा प्रसार थांबवण्याच्या हेतूने लादण्यात येत असलेल्या निर्बंधाच्या प्रयोजनार्थ सोलापूर जिल्ह्याच्या स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या प्रादेशिक अधिकारी क्षेत्रांमधील सोलापूर महापालिकेत स्वतंत्र प्रशासकीय युनिट म्हणून घोषित करण्यात येत आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांना आता स्वतंत्र निर्णय घेण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत.

त्यानंतर महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी आज गुरुवारी रात्री प्रसारमाध्यमांशी बोलताना महानगरपालिकेला स्वतंत्र निर्णय घेण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत .त्यामुळे आता सोलापूर शहरात कशा पद्धतीने निर्बंध शिथिल करायचे. याबाबत काही वेळातच ऑर्डर काढणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे सोलापूरकरांनी केलेल्या मागणीला व आंदोलनाला आता यश आले आहे.

शहरांमध्ये राजकीय प्रतिनिधी, व्यापारी संघटना, रस्त्यावर उतरल्या होत्या. पालकमंत्र्यांना वगळून राजकीय नेत्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह मुख्य सचिवांचे दार ठोठावले होते. आज अखेरीस त्यास यश प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे. या निर्णयामुळे व्यापाऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले जातील. परंतु भविष्यात लोकांची गर्दी झाल्याने कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उद्यापासून म्हणजेच शुक्रवारपासून सोलापूर शहरात नेमक्या कोणत्या दुकानांना परवानगी मिळणार आणि त्यांची वेळ काय असणार हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे .