फिल्म फेडरेशन कार्यकारिणीवर डॉ.रविंद्र चिंचोलकर यांची निवड

Big9news Network

सोलापूर- फिल्म फेडरेशन सोसायटी ऑफ इंडियाच्या कार्यकारिणीवर (पश्चिम विभाग) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रविंद्र चिंचोलकर यांची नियुक्ती झाली आहे.

फिल्म फेडरेशन सोसायटी ऑफ इंडिया पश्चिम विभागाचे कार्याध्यक्ष सुधीर नांदगावकर यांनी सदर नियुक्तीचे पत्र डॉ. चिंचोलकर यांना पाठविले आहे. फिल्म फेडरेशन सोसायटी ऑफ इंडिया पश्चिम विभागाची वार्षिक बैठक ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाली. या बैठकीत नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. या कार्यकारिणीत डॉ.रवींद्र चिंचोलकर यांचा समावेश करण्यात आला आहे. फिल्म फेडरेशन सोसायटी ऑफ इंडियाच्या (पश्चिम विभाग ) नवीन कार्यकारिणीचे अध्यक्ष किरण शांताराम असून कार्याध्यक्ष सुधीर नांदगावकर आहेत. या कार्यकारिणीत एकंदरीत 15 सदस्यांची निवड करण्यात आलेली आहे. विद्यापीठे व महाविद्यालयात फिल्म सोसायटीचे काम कॅम्पस फिल्म सोसायट्यांद्वारा चालविले जाते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील मास कम्युनिकेशन विभागात 2010 पासून कॅम्पस फिल्म सोसायटीचे कार्य सुरू आहे. विद्यार्थ्यांना अभिजात सिनेमाची ओळख करून देणे आणि सिनेमा कसा पहावा याची जाण त्यांच्यात निर्माण करणे हे कॅम्पस फिल्म सोसायटीचे प्रमुख कार्य आहे. कॅम्पस फिल्म सोसायटीचे एक प्रतिनिधी फिल्म फेडरेशनच्या कार्यकारिणीचे सदस्य म्हणून नियुक्त केले जात असतात. त्यानुसार डॉ. चिंचोलकर यांची नियुक्ती झालेली आहे. फिल्म फेडरेशनने दिलेली ही जबाबदारी मी स्वीकारत असून यापुढच्या काळात कॅम्पस सोसायटीचे काम  वाढावे या दृष्टीने प्रयत्न करण्याची संधी मला या निमित्ताने मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. चिंचोलकर यांनी व्यक्त केली आहे .