सीईओ स्वामी यांनी कोरोना रुग्णांचे ताणतणाव व्यवस्थापनावर केले प्रबोधन

Big 9 News Network

आज कोविड केअर सेंटर तालुका दक्षिण सोलापूर केटरींग कॉलेज येथे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी कोविड केअर सेंटर मधील कोरोना बाधीत रूग्णांना ताणतणाव व्यवस्थापनावर प्रबोधन केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, गटविकास अधिकारी दक्षिण सोलापूर राहूल देसाई, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दिगंबर गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. केरू खरे, गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे व कोविड केअर सेंटर मधील दाखल सर्व रूग्ण उपस्थित होते.

“कल्पनेची सासू त्याला बहुतची जाचू” ज्ञानेश्वर महाराजांच्या या अभंगाप्रमाणे माणसाच्या मनातील अनामिक भितीच माणसाला जास्त त्रास देते. आपणाला झालेला आजार जिवघेणा आहे हा समज मनातून काढून टाका. स्वतःवर व आपल्या डॉक्टरांवर विश्वास ठेवा आपण नक्की बरे व्हाल. मीसुद्धा या आजाराने ग्रस्त होतो न डगमगता मी त्या परिस्थितीचा सामना केला आहे. आपला दृष्टिकोन नेहमी सकारात्मक ठेवून आजारावर मात करता येते. आपला हेकेखोरपणा सोडा. जगात आपल्या मनाप्रमाणेच सर्व होते असे नाही. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्या सोडून द्यायला शिका, तडजोड करायला शिका. आलेल्या संकटाचा विचार न करता त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधा. आपल्याला आवडेल असे संगीत ऐका, चित्रपट पहा, आपल्या आवडीची पुस्तके वाचा मन रमेल असे आपले छंद जपा. चांगले मित्र जोडा त्यांच्याकडे आपले मन मोकळे करा. व्यसन मग ते कोणतेही असो करू नका. नियमितपणे व्यायाम व योगासने करा. अशा रीतीने कोविड बाधीत रुग्णांना सीईओ स्वामी यांनी प्रबोधन केले.