Big9 News
श्री नरेश लालवानी, महाव्यवस्थापक मध्य रेल्वे यांनी मुंबईतील एक, पुणे आणि सोलापूर विभागातील प्रत्येकी दोन अशा ५ मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांना दि. १४ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात “महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार” प्रदान केला. फेब्रुवारी २०२४ मध्ये कर्तव्य बजावताना त्यांनी सतर्कतेसह, अनुचित घटना टाळण्यात आणि रेल्वे संचालनात संरक्षेची खात्री करण्यासाठी दिलेले योगदान याबद्दल हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या पुरस्कारामध्ये पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, अनुकरणीय सुरक्षा कार्याचे प्रशस्तिपत्रक आणि ₹ २०००/- रोख पुरस्कार यांचा समावेश आहे.
श्री लालवानी यांनी पुरस्कार प्राप्त कर्मचार्यांच्या सतर्कतेचे कौतुक केले आणि नमूद केले की, ते प्रत्येकासाठी अनुकरणीय आदर्श आहेत. पुरस्कार प्राप्त कर्मचार्यांनी ट्रॉली क्रॅक शोधणे, चाकातील स्पार्कलिंग शोधणे, हॉट ऍक्सल्स आणि ट्रेनमधून जाणार्या स्पार्क आणि धुराची वेळेवर माहिती देणे यासारख्या सुरक्षेच्या विविध क्षेत्रांमध्ये ट्रेन सुरक्षितपणे चालविण्याबाबत मोठी आवड आणि वचनबद्धता दाखवली. मध्य रेल्वेला सर्व पुरस्कारप्राप्त कर्मचार्यांचा अभिमान आहे ज्यांनी आपल्या तत्परतेने आणि सतर्कतेने कोणतीही अप्रिय घटना घडण्याची शक्यता टाळण्यास मदत केली. पाच महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार विजेते असे आहेत:
मुंबई विभागाचे मोटर मॅन श्री महेंद्र शेळके, पुणे विभागाचे स्टेशन व्यवस्थापक श्री डी के मौर्या, लोको पायलट पॅसेंजर, श्री पंकज कडेकर, तसेच सोलापूर विभागाचे श्री रजनीश रंजन, लोको पायलट गुड्स आणि श्री राजेश वाडिया, तंत्रज्ञ हे होते.
श्री आलोक सिंग, अतिरिक्त महाव्यवस्थापक, श्री डी वाय नाईक, प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी, श्री मुकुल जैन, प्रधान मुख्य परीचालन व्यवस्थापक, श्री एन पी सिंग, प्रधान मुख्य विद्युत अभियंता, श्री सुनील कुमार, प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता आणि यावेळी मध्य रेल्वेच्या इतर विभागांचे प्रधान प्रमुख उपस्थित होते आणि सर्व विभागांचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक या कार्यक्रमात व्हर्च्युअली सामील झाले.