Big9 News
संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्वसामान्य व गोरगरीब गरजू रुग्णांना सढळ हस्ते मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या नऊ महिन्यांत ६२०० रुग्णांना एकूण ५० कोटी ५५ लाख रुपयांची मदत दिली आहे.
राज्यातील एकही सर्वसामान्य व गोरगरीब गरजू रुग्ण पैशाअभावी उपचाराविना राहणार नाही याची काळजी घ्या, असा आदेशच संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिला आहे. त्यांच्या सूचनेचे तंतोतंत पालन करून रुग्णांना दिलासा देण्यात येत आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे आणि त्यांची सर्व टीम पहिल्या दिवसापासून रुग्णसेवेत झोकून देऊन काम करीत आहे.
या कक्षामार्फत पहिल्याच म्हणजे जुलै २०२२ या महिन्यात 194 रुग्णांना 83 लाखांची मदत देण्यात आली. नंतर ऑगस्ट महिन्यात 276 रुग्णांना 1 कोटी 40 लाख, सप्टेंबर महिन्यात 336 रुग्णांना 1 कोटी 93 लाख, ऑक्टोबर महिन्यात 256 रुग्णांना 2 कोटी 21 लाख, नोव्हेंबर महिन्यात 527 रुग्णांना 4 कोटी 50 लाख, डिसेंबर महिन्यात 8 कोटी 52 लाख, जानेवारी 2023 मध्ये 8 कोटी 89 लाख तर फेब्रुवारी 2023 मध्ये 10 कोटी 27 लाख आणि मार्च 2023 मध्ये विक्रमी 11 कोटी 95 लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.