जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती
सोलापूर, दि.4: सोलापूर जिल्ह्यात 68.41 टक्के पीककर्ज वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली. जिल्ह्यासाठी खरीप हंगामात 1438 कोटी 52 लाख रुपयांचे उद्दिष्टये होते त्यापैकी 984 कोटी 15 लाख पीककर्ज वाटप झाले आहे. एकूण 66 हजार 151 खातेदारांना हे वाटप झाले असल्याची माहिती श्री.शंभरकर यांनी दिली.
श्री. शंभरकर यांनी सांगितले की, ‘ जिल्ह्यात 1 जून ते 3 ऑगस्ट 2020 पर्यंत 322.9 मिलिमिटर पाऊस झाला. हा सरासरीच्या तुलनेत 155.5 टक्के पाऊस आहे. जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये 3 लाख 59 हजार 294 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. चांगल्या पावसामुळे सरासरीच्या 153 टक्के पेरणी झाली आहे.’
प्रधानमंत्री पीकविमा योजनेत 2 लाख 68 हजार 542 शेतकऱ्यांनी सहभाग नोदविला. जिल्ह्यातील एकूण संरक्षित रक्कम 501.82 कोटी रुपये असून यामध्ये शेतकऱ्यांचा हिस्सा 10.27 कोटी रुपयांचा आहे. सर्वात जास्त बार्शी तालुक्यातील 1 लाख 18 हजार 318 शेतकऱ्यांचा प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले.
सोयाबीन बियाणे उगवणीसंदर्भात सात तालुक्यातून 510 तक्रारी प्राप्त झाल्या. तक्रार निवारण समितीने 455 तक्रारींची प्रत्यक्ष पाहणी केली असता 191 तक्रारीमध्ये बियाणात दोष आढळून आला. त्यापैकी शेतकऱ्यांना सहा क्विंटल बियाणे बदलून दिले. 52 शेतकऱ्यांना 2 लाख 35 हजार 135 रुपये कंपनीमार्फत नुकसान भरपाई देण्यात आली. निकृष्ठ बियाणासंदर्भात ग्रीन गोल्ड कंपनीवर वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाबीज, यशोदा सिड्स व दप्तरी सिड्स कंपन्यांवर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. बनावट व निकृष्ठ खताबाबत करमाळा पोलीस ठाण्यात दोन तर मोहोळ पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे आदी उपस्थित होते.
पीककर्ज वाटपाबाबत दृष्टीक्षेप
बँकेचे नांव | खरीप हंगाम उद्दिष्ट (रु.लाखामध्ये) | खरीप हंगाम वाटप (रु.लाखामध्ये) | खरीप हंगाम टक्केवारी |
राष्ट्रीयकृत बँका | 105969.00 | 52044.41 | 49.11% |
खाजगी बँका | 18286.00 | 26561.18 | 145.25% |
सोलापूर जि.म.स. बँक | 15457.00 | 15294.37 | 98.95% |
विदर्भ कोकण ग्रामीण बँक | 4140.00 | 4515.66 | 109.07% |
एकूण | 143852.00 | 98415.62 | 68.41% |
Leave a Reply