संचारबंदीमध्ये पंढरपुरात अत्यावश्यक सेवा सुरू -जिल्हाधिकारी

  • जिल्हा प्रशासनाला सहकार्य करा 
  • जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन

                सोलापूर, दि.6: पंढरपूर तालुक्यात व शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग आणि प्रादुर्भाव वाढत आहे. ही साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शहरासह आसपासच्या काही गावात 6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 13 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

          तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधींशी चर्चा करून नागरिकांच्या हितासाठी संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा आणि दूध वितरण सुरू राहणार आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात येणार आहे. हे काम करणाऱ्या पथकांना सहकार्य करा. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. आपली टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास आपल्यावर इलाज करणे सोयीस्कर होणार आहे. टाळाटाळ करू नका, असेही श्री. शंभरकर यांनी सांगितले आहे.

          मास्कचा वापर करा. सुरक्षित अंतर ठेवा, हात साबणाने स्वच्छ धुवा. कोरडा खोकला, ताप किंवा श्वास घेण्यास त्रास झाल्यास तत्काळ दवाखान्याशी संपर्क करून उपचार करून घ्या. जा.  कोणतीही अडचण निर्माण झाल्यास जिल्हा प्रशासनाशी संपर्क करा. घाबरू नका…पण जागरूक रहा, या काळात जिल्हा प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहनही श्री. शंभरकर यांनी केले.