अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरण: CBIकडून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

सुप्रसिध्द बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणास वेगवेगळे वळण लागत आहे. दरम्यान, तपास आता केंद्रीय अन्वेषण विभाग (C.B.I.) हाती घेतला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागने या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या सहा जणांमध्ये  रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती, रियाची आई संध्या चक्रवर्ती, वडील इंद्रजित चक्रवर्ती, सुशांत आणि रियाचा मित्र सॅम्युअल मिरांडा, श्रुती मोदी यांच्याविरोधात एफआआर दाखल केली आहे.

अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यासाठी बिहार सरकार सातत्याने मागणी केंद्र सरकारकडे करत होते. त्यानंतर केंद्र सरकारने ही शिफारस मंजूर करत सीबीआयकडे तपास सोपवला. या प्रकरणी आता सीबीआयने तपास सुरू केला असून सहा जणांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल केला आहे.

मनी लॉन्ड्रिंग कायद्याअंतर्गत गुन्हा…

या प्रकरणामुळे रिया चक्रवर्ती हिला अंमलबजावणी संचालनालयाकडून समन्स बजावण्यात आले आहे. ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयासमोर ७ ऑगस्ट रोजी रियाला चौकशीसाठी हजर व्हावे लागणार आहे. बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने गेल्या आठवड्यात रियाच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंग कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

बिहारमधील पाटणा येथे सुशांतच्या वडिलांनी याबाबत तक्रार दाखल केली. त्यानंतर या प्रकरणाची एफआयआर बिहारमधून मुंबईत हस्तांतरित करण्यासाठी रियाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर ५ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणी घेण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने रिया चक्रवर्तीला अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला होता. याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने तिन्ही पक्षांना पुढील तीन दिवसांत आपले उत्तर देण्यास सांगितले आहे. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी आता एका आठवड्यात होणार आहे.