- मंद्रूप,दि.9: दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर येथे किरकोळ भांडणावरून एका तरुणाला जबर मारहाण करण्यात आली. यामध्ये त्या तरुणाचा शुक्रवारी,सकाळी नऊ वाजता मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शंकरनगर येथील तीन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांनाही मंद्रूप पोलिसांनी अटक केली आहे.
नागनाथ सुरेश साबळे (वय 28,रा. विंचूर, ता. द.सोलापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या खून प्रकरणी गुरुनाथ भीवा पवार, प्रवीण गुरुनाथ पवार व सुनील गुरुनाथ पवार ( तिघेजही रा. शंकरनगर ता.द. सोलापूर)असे खून केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मयत नागनाथ साबळे व आरोपी प्रवीण पवार यांच्यामध्ये विंचूर येथील जिल्हा परिषद शाळेत पत्ते खेळताना बुधवारी सांयकाळी पाच वाजता भांडण झाले. त्यानंतर प्रवीण पवार यांनी शंकरनगर येथे जाऊन वडिलांना व भावाला याची माहिती दिली. त्यानंतर वरील ठिकाणी विंचूर येथील इंदिरानगर जवळ सायंकाळी या तिघांनी नागनाथ साबळे याला लाथाबुक्याने पोटात जबर मारहाण केली.त्या मारहाणीत नागनाथ साबळे हा जखमी झाला होता.शुक्रवारी, सकाळी नागनाथ साबळे यास पोटात जास्त त्रास होऊ लागला.त्यांच्या परिवारातील सदस्यानी त्यांस उपचारास घेऊन जाण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर शिंदे, मंद्रूपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन थेटे,उपनिरीक्षक गणेश पिंगूवाले यांनी घटनास्थळी धाव घेऊ घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला आहे. तीनही आरोपींना मंद्रूप पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मयत नागनाथचा भाऊ सचिन सुरेश साबळे यांनी याप्रकरणी मंद्रूप पोलिसांत फिर्याद दिली आहे.पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर शिंदे हे करीत आहेत.
Leave a Reply