साहेब ! जय महाराष्ट्र ; एका शेतकऱ्याने मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिलेलं खुलं पत्र..वाचा

सोलापूर जिल्ह्यात असलेल्या शेतामध्ये अतिवृष्टी, महापुरामुळे किती नुकसान झालेलं पाहणी करण्यासाठी व जनतेला आधार देण्यासाठी आपण येताय .
पण साहेब नदी काठावरील खूप विदारक परिस्थिती आहे.संपुर्ण ऊसपिक व इतर पिके भुईसपाट झालेली दिसतील, लाईटचे खांब पडलेले, तारा तुटलेल्या बांध फुटलेले, कसं सावरायचं हे सुचत नाही.त्याही पेक्षा वाईट असं की माती वाहुन गेल्यानं जमीन नापिक होणारं आहे.

साहेब संपूर्ण सोलापुर आणि परिसरामध्ये झालेल्या अतिवृष्टिमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे तेव्हा नुकसानीचे पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई मिळावी, पूरस्थितीमुळे ठिक ठिकाणी रस्ते, छोटे पुल व बंधारे वाहून जावून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे .त्याची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करावा. अतिवृष्टीमुळे दुर्दैवाने मृत पावलेल्या शेतकर्याच्या कुटुंबियांना त्वरित आर्थिक मदत मिळावी.
काही गावातील शेतकऱ्यांच्या गोठ्यात पाणी शिरून जनावरे वाहून गेली असून, घरामध्ये, दुकानामध्ये पाणी शिरून जीवनावश्यक वस्तूंचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या ठिकानी भेटी देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहीजे व त्या सोडविण्याचे काम आमदार, खासदार सर्वच लोकप्रतिनिधी नी प्रामाणिक करावे.परंतू तसे होताना दिसत नाही. याकडे ही तिरकी नजर फिरवा.

उजनी धरण व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणा मुळे हा महापूर

14 ते 17 ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात अतिवृष्टी होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यानंतरही उजनी व्यवस्थापन गाफील राहिले आणि 14 आॅक्टोबर रोजी सुद्धा धरणाची पाणी साठा पातळी 111.28 टक्के एवढी राखली. 13 ऑक्टोबर रोजी उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ही 75 मिलीमीटर पाऊस पडला होता तरीही 14 ऑक्टोबर रोजी सकाळी धरणातून केवळ 10 हजार क्यूसेक ने पाणी सोडण्यात येत होते. 14 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजल्यापासून धरणातून अतिशय मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यास सुरुवात केली. काही तासात भीमा नदीचा विसर्ग 10 हजारावरून 2 लाख 25 हजार क्यूसेक इतका वाढवण्यात आला.

त्यामुळे भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना आपली घरे दारे, दुकाने, शेतातील साहित्य जसेच्या तसे सोडून पलायन करावे लागले.हजारो घरे, शेकडो दुकाने, अनेकांचे व्यवसाय, पाण्यात गेली.
ही परिस्थिती उजनी धरण व्यवस्थापनाच्या निष्क्रियतेमुळे निर्माण झाल्याने पुराचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला. बेजबाबदारपणा उजनी व्यवस्थापणाने दाखवला असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. पाणी सोडण्यात विलंब का लागला, कुणामुळे लागला याचीही चौकशी व्हावी.

साहेब आपण महसूल व कृषी विभागाला झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आसल्या तरी शासनाने यामध्ये वेळ न घालवता त्वरीत ओला दुष्काळ जाहीर करुन, सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी. शेतकरी आस्मानी संकटामुळे खचून जाऊ लागला आहे.त्याला आधार देण्यासाठी फळबागांसाठी हेक्टरी दिडलाख तर इतर पिकांना पन्नास हजार नुकसान भरपाई द्यावी हि नम्र विनंती.

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा.”

जय महाराष्ट्र…!
शिवाजी हळणवर