पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील 59 लाख विद्यार्थ्यांपैकी फक्त 2 लाख विद्यार्थीच उपस्थित

सोलापूर,दि.24 : शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होते की, शाळा सुरू करणे बंधनकारक नाही. राज्यातील विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून स्थानिक पातळी परिस्थतीत कोरोनाची काय आहे, हे ठरवून निर्णय घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पालकांची संमती गरजेची असून विद्यार्थी शाळेत आलेच पाहिजे, असंही बंधन नसणार आहे.

राज्यात नववी ते बारावीपर्यंतच्या 25 हजार 866 शाळा आहेत. या शाळांमध्ये 59 लाख 27 हजार 456 विद्यार्थी प्रवेशित आहेत. या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी 2 लाख 75 हजार 470 शिक्षक असून त्यांच्या सेवेसाठी 96 हजार 666 शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. राज्य सरकारच्या निर्णयानुसार आतापर्यंत 1 लाख 41 हजार 720 शिक्षकांची कोरोना चाचणी पार पडली आहे. त्यामध्ये 1353 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह सापडले असून, 44 हजार 313 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये 290 कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले आहेत.

कोरोनाच्या भीतिपोटी राज्यातील तब्बल 57 लाख विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपला पाल्य शाळेत पाठवलाच नाही; तर दुसरीकडे जळगाव, ठाणे, धुळे, नांदेड, नागपूर, नाशिक, परभणी, पालघर, मुंबई आणि हिंगोली या जिल्ह्यातील एकही शाळा पहिल्या दिवशी उघडली गेली नाही.

संबंधित पाल्य शाळेत पाठवण्यापूर्वी त्या पालकांनी लेखी संमतीपत्र देणे बंधनकारक करण्यात आले. या पार्श्वभूमीवर पहिल्याच दिवशी 25 हजार 866 पैकी 16 हजार 779 शाळा बंदच राहिल्या. तर दुसरीकडे राज्यातील एकूण 59 लाख 57 हजार 456 विद्यार्थ्यांपैकी 56 लाख 28 हजार 263 विद्यार्थी शाळेत गेलेच नाहीत.