विशेष लेख ; मकर संक्रांती विशेष
मकरसंक्रांत आली, की घरोघरी गुळ पोळ्या आणि तिळगुळ बनविला जातो. ‘तिळगुळ घ्या आणि गोड बोला’ असे म्हणत आपण सर्वच एकमेकांना तिळगुळ देऊन संक्रांतीचा सण साजरा करीत असतो. तिळगुळ, किंवा तिळाचे लाडू चवीला अतिशय चविष्ट तर असतातच, पण त्याशिवाय आरोग्यासाठी देखील अतिशय लाभकारी असतात. तिळामध्ये शरीराच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे कॅल्शियम, लोह, ऑक्लेजिक अॅसिड, अमिनो अॅसिड्स, प्रथिने, आणि बी, सी, आणि ई जीवनसत्वे असतात. तर गुळामध्ये क्षार, लोह, सुक्रोज आणि ग्लुकोज ही तत्वे आहेत. त्यामुळे तीळ आणि गूळ हे दोन्ही आरोग्यवर्धक पदार्थ एकत्र केले जातात, तेव्हा शरीराला पोषण देणाऱ्या तत्वांनी युक्त असा तिळगुळ सर्वार्थाने आरोग्यवर्धक ठरतो.
तीळ आणि गूळ हे पदार्थ उष्ण असल्याने, हिवाळ्यामध्ये सतत उद्भविणाऱ्या सर्दी पडशापासून शरीराला संरक्षण मिळते. यांच्या सेवनाने शरीरातील उष्णता वाढते. तसेच जर बद्ध्कोष्ठाची तक्रार असेल, तर तिळाच्या लाडवांचे सेवन करावे. ज्या व्यक्तींना तीळ आवडत नसतील त्यांनी केवळ गुळाचे सेवन केल्याने देखील बद्धकोष्ठ दूर होईल.
हिवाळ्याच्या मोसमामध्ये अस्थमा किंवा तत्सम श्वसनासंबंधी विकार असलेल्यांना सतत त्रास उद्भवू लागतो. कमी तापमान आणि त्याच्या जोडीला हवेतील प्रदूषण ह्या दोन्ही गोष्टी दम्याचा विकार असणाऱ्यांसाठी त्रासाच्या ठरतात. अश्या व्यक्तींनी हिवाळ्यामध्ये तिळाच्या लाडवांचे सेवन आवर्जून करावे. या मुळे छातीमध्ये कफ साठत नाही, आणि जर जफ झाला असेल, तर तो बाहेर पडतो. कफ झाला असल्यास गरम दुधासोबत तिळाच्या लाडवांचे सेवन करावे.
तिळाच्या लाडवांचे सेवन दररोज केल्याने सांधेदुखी कमी होते. तीळ आणि गूळ हे दोन्ही पदार्थ लोह युक्त आहेत. तसेच दुधाच्या जोडीने तिळाच्या लाडवांचे सेवन केल्याने शरीराला आवश्यक ते कॅल्शियम देखील मिळते. तसेच शरीरामध्ये अशक्तपणा जाणवत असेल, तरी त्यासाठी तिळाच्या लाडवांचे सेवन अतिशय लाभकारी ठरू शकते. याच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढून लहान सहान आजार दूर राहतात. मात्र तिळाच्या लाडवांचे सेवन हिवाळयापुरतेच मर्यादित ठेवावे. उन्हाळ्यामध्ये याच्या सेवनाने शरीरामध्ये उष्णता जास्त होऊन नाकातून रक्त येणे, त्वचा सतत लालसर दिसणे अश्या प्रकारच्या तक्रारी उद्भवू शकतात.
संक्रांतीला तीळाचे महत्व
————————————-
संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खायचे तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाच्या डाळीची खिचडी, वांगी, सोताणे, वावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थाचा वापर जेवणात करायचा. तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ सिग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतु तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करायची स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे.
🍒🍇 बोरन्हाण 🍇🍒
नवविवाहितेसाठी पहिली संक्रांत जेवढी महत्त्वाची तेवढीच नव्या बाळासाठीही. या निमित्ताने शिशुसंस्कार म्हणून बाळाला बोरन्हाण घातलं जातं. बदलत्या ऋतूमानाशी जुळवून घेत शारीरिक आरोग्य राखायचा व्यापक विचार यामागे आहे.
वर्षभर साजरे होणारे विविध सण म्हणजे रोजच्या धकाधकीच्या जीवनापासून काही काळ तरी लांब राहण्याचं निमित्त. या निमित्ताने सर्व नातेवाईकांची गाठभेटही घेता येते. शिवाय, सणासमारंभांच्या माध्यमातून आपल्या रूढी परंपरा जपणं, हाही आपल्या पूर्वजांचा हेतू त्यात आहेच.
मकर संक्रात हाही असाच एक सण. नवविवाहितेसाठी पहिली संक्रांत जेवढी महत्त्वाची तेवढीच घरात आलेल्या नव्या बाळासाठीही. संक्रांतीला बाळासाठी काळं झबलं शिवून त्यावर खडी काढण्याची किंवा हलव्याचे दाणे चिकटवण्याची जुनी प्रथा होती. आता खडी काढण्यापेक्षा भरतकाम, पेण्टिंग करण्याकडे अधिक भर दिसतो. या दिवशी बाळाला हलव्यापासून बनवलेले मुकूट, बासरी, बाजूबंद, गळ्यातला हार, कंबरपट्टा इ. दागिने घातले जातात. आपल्याकडे एरवी काळा रंग निषिद्ध असला, तरी या दिवशी काळे कपडे आवर्जून घातले जातात.
पहिल्या संक्रांतीच्या निमित्ताने शिशुसंस्कार म्हणून बोरन्हाण करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. संक्रातीपासून रथसप्तमी पर्यंतच्या या काळात हे बोरन्हाण घातलं जातं. ज्या दिवशी बोरन्हाण करणार, त्या दिवशी बाळाला काळं झबलं आणि हलव्याचे दागिने घातले जातात. मग, या कार्यक्रमासाठी बोलावलेल्या लहान लहान मुलांच्या मधे बसवून बाळाचं औक्षण केलं जातं. नंतर त्याच्या डोक्यावरून चुरमुरे, हलवा, बोरं, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, सुटे पैसे, चॉकलेट गोळ्या इ. एकत्र करून घातलं जातं. जमलेल्या इतर मुलांनी हे सर्व पदार्थ वेचून घरी घेऊन जायचं असतं. घरी आलेल्या सुवासिनींना हळदीकुंकू दिलं जातं. बोरन्हाण घातल्यावर मुलाला पुढच्या उन्हाळ्याची बाधा होत नाही, असा एक समज आहे यामागे आहे.
केवळ करायची म्हणून ही प्रथा नाही तर याला शास्त्रीय कारणंही आहेत. थंडीच्या या दिवसांत हे पदार्थ खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. संक्रातीला सुगड भरताना किंवा बोरन्हाणासाठी उसाचे करवे, बोरं, भुईमुगाच्या शेंगा, तीळ आदींचा उपयोग केला जातो. याचं कारण म्हणजे त्या त्या ऋतूत येणाऱ्या पिकपाण्याचा उपयोग आपण पूर्वापार करत आलो आहोत. बदलत्या ऋतूमानाशी जुळवून घेत शारीरिक आरोग्य राखायचा, असा व्यापक विचारही त्यामागे दिसून येतो.
बोरन्हणाच्या निमित्ताने बोरं, ऊस, हलवा हे पदार्थ मुलं खातात. नवीन चवींबरोबरच नव्या लोकांशीही त्यांची ओळख होते. बऱ्याच घरात मूल पाच वर्षाचं होईपर्यंत त्याचं बोरन्हाण केलं जाते. या निमित्ताने लहानमोठ्या सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळते. आज कामाच्या निमित्ताने बाहेर राहणाऱ्या आपल्या सगळ्यांसाठी ही काळाची गरज बनली आहे.
आज माणसामाणसात बदलत्या जीवनपद्धतीमुळे काहीसा थकवा आणि त्याचबरोबर अंतर निर्माण झालं आहे. सणावारांच्या या निमित्ताने घरात आणि घराबाहेरही माणसामाणसातलं अंतर, त्याचबरोबर एकमेकांमधली स्पर्धा, ईर्ष्या, मत्सर या भावनाही नष्ट व्हायला हव्या आहेत. हळदीकुंकू, तिळगुळ समारंभ, बोरन्हाण याच्या माध्यमातून नात्यात गोडवा निर्माण करून जोपासता येईल.
तिळगुळ घ्या गोड बोला‘ असं म्हणत एकमेकांना हलवा देण्याची पद्धत, या सणाला विविध वस्तू दान करणं, बाहेरगावी असणाऱ्या नातेवाईकांकडे तिळगूळ पाठवणं, आपले तांदूळ दुसऱ्याच्या आधणात शिजवण्याची कोकणातील प्रथा या सर्व गोष्टी सामाजिक एकोपा निर्माण करणाऱ्या आहेत. म्हणूनच काळाच्या ओघात फॉरवर्ड होतानाही आपल्या जुन्या परंपरा निभावत सामाजिक आणि शारीरिक आरोग्य समृद्ध होण्यासाठी आपणच प्रयत्न करायला हवेत.
सौजन्य आणि संदर्भ : हेमा आघारकर
…………………………⚜……………………
संकलन – श्रीधर कुलकर्णी
ज्ञानामृत मंच ग्रुप
Leave a Reply