‘तूने मुझे बुलाया शेरावाली ये’ फेम गायक नरेंद्र चंचल यांचे निधन

नवी दिल्ली : मनोरंजन क्षेत्रासाठी एक वाईट बातमी आली आहे. प्रसिद्ध भजन गायक नरेंद्र चंचल यांचे निधन झाले आहे. ते ८० वर्षांचे होते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास गायक नरेंद्र चंचल यांचे निधन झाले. ते गेल्या तीन महिन्यांपासून आजारी होते आणि दिल्लीली अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दीर्घ काळापासून ते आजारी होते. नरेंद्र चंचल यांनी अनेक भजनांसह हिंदी सिनेमांतील गाणी सुद्धा गायली आहेत. विशेषत: भजन गायनांसाठी नरेंद्र चंचल प्रसिद्ध होते.

नरेंद्र चंचल यांचा जन्म १६ ऑक्टोबर १९४० मध्ये अमृतसरमधील एका धार्मिक पंजाबी कुटुंबात झाला. कुटुंबातील धार्मिक वातावरणात ते मोठे झाले आणि त्यामुळे त्यांना सुरुवातीपासूनच भजन-किर्तनाची आवड होती. नरेंद्र चंचल यांना अमेरिकेच्या जॉर्जिया राज्याचे मानद नागरिकत्वही मिळाले होते.

‘या’ गाण्यामुळे नरेंद्र चंचल यांना मिळाली ओळख

नरेंद्र चंचल यांनी गेल्या अनेक दशकांपासून भजन-कीर्तनात सक्रिय होते. बऱ्याच वर्षांच्या संघर्षानंतर नरेंद्र चंचल यांनी १९७३ मध्ये अभिनेता ऋषी कपूर-डिंपल कपाडिया यांच्या बॉबी सिनेमासाठी गाणे गायले होते. बेशक मंदिर मस्जिद हे गाणे त्यांनी गायले. यासाठी नरेंद्र चंचल यांना फिल्मफेअर बेस्ट मेल प्लेबॅक पुरस्कार सुद्धा मिळाला होता. नरेंद्र चंचल यांना ‘आशा’ सिनेमात गायलेले भजन ‘चलो बुलावा आया है’ या गाण्याच्या माध्यमातून रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आणले.

लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्यासोबत गायले गाणे

बॉबी सिनेमानंतर नरेंद्र चंचल यांनी १९७४ मध्ये बेनाम आणि रोटी कपडा और मकान या सिनेमांसाठी गाणी गायली. लता मंगेशकर यांच्यासोबत नरेंद्र चंचल यांनी गाणी गायली आहेत. तसेच मोहम्मद रफी यांच्यासोबत १९८० मध्ये ‘तूने मुझे बुलाया शेरा वालिए’ हे गाणं गायले. तर १९८३ मध्ये आशा भोसले यांच्यासोबत चलो बुलावा आया है माता ने बुलाया है हे गाणे गायले.