अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे व फुलचंद नागटिळक प्रतिष्ठान तर्फे 3 गुंठा पंच्याहत्तर पिके मॉडेल च्या जनक मनीषा भांगे यांना कृषीभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. शेती क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. बार्शी येथे 14 व 15 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या 17व्या ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये गौरव केला जाणार आहे. ज्येष्ठ पत्रकार राजा माने व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या उपस्थितीमध्ये हे संमेलन बार्शी येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे पार पडणार आहे.
मनिषाताई भांगे यांनी कुटुंबाचे पोषण सुरक्षा संभाळणारी शेती पद्धती विकसित केली असून केवळ तीन गुंठा जागेत एका कुटुंबाला लागणाऱ्या भाज्या, फळे, औषधी वनस्पती, फुले, वनझाडे, गांडूळ खत निर्मिती चे नावीन्यपूर्ण मॉडेल विकसित केले आहे. गेल्या दहा वर्षापासून त्या सेंद्रिय पद्धतीने शेती करत आहेत. तसेच गावरान बियांची बीज बँक त्यांनी तयार केली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो शेतकरी व शेती अभ्यासक यांनी त्यांच्या मॉडेलला भेट देऊन कौतुक केले आहे.
यापूर्वीही त्यांना विविध पुरस्कार प्राप्त असून नाशिक येथील आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनामध्ये गुरुमाऊली पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. शाळेचे तोंडही न पाहिलेल्या मनिषाताई भांगे यांच्या शेती क्षेत्रातील योगदानाबद्दल व पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Leave a Reply