देऋब्रातर्फे समर्थांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करून दासनवमी साजरी

 

समर्थ रामदास स्वामी महाराष्ट्र धर्माचे प्रणेते : डॉ. येळेगावकर

देऋब्रातर्फे समर्थांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करून दासनवमी साजरी

महाराष्ट्राच्या सामाजिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक जीवनाला आकार देण्यामध्ये अनेक संत महंतांनी आपले योगदान दिले आहे. या संत महंतांमध्ये समर्थ रामदास स्वामी यांचा देखील मोठा वाटा आहे. एका अर्थाने ते महाराष्ट्र धर्माचे प्रणेते होते, असे प्रतिपादन प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी केले.

देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेच्या दत्त चौकातील सभागृहात कोरोनाचे नियम पाळून आणि मर्यादित नागरिकांच्या उपस्थितीत रविवारी दुपारी दास नवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास अ.भा.दे. ऋ. मध्यवर्ती मंडळाचे सचिव संजय कुलकर्णी, कार्यकारिणी सदस्य रोहिणी तडवळकर, डॉ. अजितकुमार देशपांडे, सतीश पाटील, सल्लागार समिती सदस्य  हरिभाऊ जतकर, महिला अध्यक्षा हेमा चिंचोळकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. येळेगावकर पुढे म्हणाले, समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म 1608  आणि त्यांचे निर्वाण झाले 1682 या 74 वर्षाच्या कालखंडात समर्थांनी अनेक सामाजिक, धार्मिक कार्य केली आहेत. वयाच्या बाराव्या वर्षीच त्यांनी “चिंता करितो विश्वाची’ असे म्हणत लग्नाच्या बोहल्यावरून घर सोडून निघून गेले. 12 वर्षे त्यांनी संपूर्ण भारतभर पायी फिरत तिर्थाटन केले. यामध्ये त्यांना समाजातील अन्याय, अत्याचार पाहिले. हिंदू समाज निष्क्रिय असल्याची जाणीव झाली आणि ही सगळी परिस्थिती बदलण्यासाठी आपण काम केले पाहिजे असा मनोमन निश्चय केला आणि त्याप्रमाणे त्यांनी काम सुरू केले आणि समाजातील भक्ती आणि शक्तीची बलोपासना व्हावी यासाठी त्यांनी जागोजागी हनुमानाची मंदिरे उभारली आहेत.

पुढे बोलताना डॉ. येळेगावकर म्हणाले, समर्थ रामदासांनी श्रीरामाची आणि हनुमानाची भक्ती केली. रामाची भक्ती करण्यामागे राम हा सत्यवचनी, एकपत्नी, प्रजाहितदक्ष राजा होता. तो योद्धाही होता. तर श्री हनुमान हे रामाचे निस्सिम भक्त होते. बलवान होते. बुद्धिवान होते. या दोघांची भक्ती करण्याचा मार्ग समाजाने अनुसरावा यासाठी प्रसार केला. याच कालखंडात दासबोधासारखा महान ग्रंथ लिहून समाजातील प्रत्येक घटकाने कसे राहिले पाहिजे, आपले जीवन कसे असले पाहिजे याची शिकवण त्यातून दिली. मनाचे श्लोक, करूणाष्टके यातून त्यांनी समाजाचे प्रबोधन केले. आपली संघटना बांधली पाहिजे, आपण चारित्र्य संपन्न, कर्तृृत्ववान असले पाहिजे. अशा व्यक्तींची समाजाला गरज असते असे सांगत त्यांनी आयुष्यभर समाज प्रबोधनाचे कार्य केले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला समर्थ रामदासांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. येळेगावकर यांच्या मार्गदर्शनानंतर मनाचे श्लोकाचे पठण करीत समर्थ रामदासांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात येऊन कार्यक्रमाची  सांगता करण्यात आली. कार्यवाह श्याम जोशी यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास देऋब्रा सोलापूर शाखेचे उपाध्यक्ष शंकरराव कुलकर्णी, विजय कुलकर्णी, दत्तात्रय आराध्ये, प्रा.डॉ. नभा काकडे,  आदींची उपस्थितीत होती.

देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था सोलापूरतर्फे दास नवमीनिमित्त संस्थेच्या सभागृहात समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी डॉ. श्रीकांत येळेगावकर, डॉ. अजितकुमार देशपांडे, विजय कुलकर्णी, हरिभाऊ जतकर, हेमा चिंचोळकर आदी.