राज्यात 31 मेपर्यंत कठोर निर्बंध; वरिष्ठ पातळीवर निर्णय

Big 9 News Network

देशासह राज्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत राज्यात 15 मे पर्यंत लॉकडाऊन(Lockdown ) लावण्यात आलाय. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकार लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढविण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. वाढणाऱ्या विशेष म्हणजे ग्रामीण भागात वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येतोय. अनेक ठिकाणी रेमिडीसिवर, ऑक्सिजनची, व्हेंटिलेटरची कमतरता भासत आहे.

सद्यस्थितीत ११ जिल्ह्यांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन,संचारबंदी लागू करण्यात आली आहे,तर आणखी काही जिल्हे 10 ते 15 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात 15 मे नंतरही कठोर निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात आला आहे. सोलापूरसह ज्या जिल्ह्यात 15 मे रोजी लॉकडाऊनची मुदत संपत आहे, अशा जिल्ह्यातही पुन्हा लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे.

सरकारला यंत्रणा मजबूत करण्यासाठी वेळ लागणार आहे. ऑक्सिजनची उपलब्धता तयार करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. 15 मे नंतर सर्व व्यवहार सुरू केले तर कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिस्थिती आहे तशीच कायम ठेवत जिल्हाधिकाऱ्यांना लॉकडाऊन जाहीर करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

जवळपास 11 जिल्ह्यांनी 10 ते 15 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. दहापैकी नाशिक आणि बुलडाणा जिल्ह्यातील लॉकडाऊन 22 आणि 23 मेपर्यंत कायम आहे. ज्यांची मुदत 15 मे रोजी संपत आहे, असे जिल्हेदेखील पुन्हा मुदतवाढ करण्याच्या मानसिकतेत असल्याचे मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुंबईतील रुग्णसंख्या सकृतदर्शनी कमी दिसत असली, तरीही लॉकडाऊन काढला तर अन्य राज्ये व जिल्ह्यातील लोक मोठ्या प्रमाणात मुंबईत येतील आणि तेथून कोरोनाची साथ पुन्हा राज्यभर पसरेल, म्हणून 31 मेपर्यंत परिस्थिती आहे तशीच ठेवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. या कालावधीत कोरोनाचा संसर्ग कितपत असेल ते पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल.

बुधवारी होऊ शकतो निर्णय..

आपल्याकडे रोज 60 ते 70 हजार रुग्ण निघत होते. त्यांची संख्या आता 45 ते 50 हजारापर्यंत कमी झाली आहे. मात्र अजूनही परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आलेली नाही. अशावेळी लॉकडाऊन काढला किंवा निर्बंधांमध्ये शिथिलता आणली तर केलेली सगळी मेहनत वाया जाईल. त्यामुळे जैसे थे परिस्थिती ठेवण्याची मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांची इच्छा आहे. त्यादृष्टीने बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत यावर अंतिम निर्णय होईल.

राजेश टोपे, सार्वजनिक आरोग्यमंत्री


11 जिल्ह्यांत संपूर्ण लॉकडाऊन


राज्यातील 11 जिल्ह्यात कडक लॉकडाऊनला सुरुवात झाली असून, दूध आणि औषधाची दुकाने चालू ठेवावीत, बाकी सर्व व्यवहार बंद ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात 10 दिवस कडक लॉकडाऊन असेल.

सोलापूर – 8 ते 15 मे
नाशिक – 12 ते 23 मे
बुलढाणा – 10 ते 23 मे
अकोला – 9 ते 15 मे
अमरावती – 9 ते 15 मे
वर्धा – 8 ते 13 मे
यवतमाळ – 9 ते 15 मे
वाशीम – 9 ते 15 मे
लातूर – 8 ते 13 मे
सिंधुदुर्ग – 9 ते 15 मे
सातारा – 5 ते 14 मे