Big9news Network
सध्याच्या काळात बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना एकाकी जीवन जगावे लागत आहे. त्यांची मुले आणि मुली परगावी अगर परदेशी गेले आहेत .हे तेथे राहू शकत नाहीत व ते येथे येऊ शकत नाहीत. त्यामुळे या ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक व मानसिक अडचणींना तोंड देत जगावे लागते. त्यांचे उरलेले आयुष्य आनंदात जावे याकरिता अशा लोकांना एकत्रित राहण्याची सोय करावी म्हणून आधार विश्वस्त संस्था संचलित प्रा.ए. डी. जोशी “आनंद सहजीवन”ची निर्मिती करण्यात आल्याची माहिती आधार केअर सेंटरचे प्रमुख सल्लागार प्राध्यापक ए. डी. जोशी आणि संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर नंदा शिवगुंडे, यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी रस्त्यावर व्यंकटेश नगरात आधार विश्वस्त संस्था संचलित “आनंद सहजीवन “हे आधार केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे .यामध्ये २८ जणांची व्यवस्था होणार आहे तर आधार केअर सेंटरमध्ये एकूण ६० नागरिकांची सोय करण्यात आली आहे. त्यांना दोन वेळ चहा आणि नाश्ता, दोन वेळचे शुद्ध शाकाहारी जेवण अशी सोय करण्यात आली आहे. याशिवाय सकाळी योगा आणि व्यायामानंतर चहा – नाष्टा तसेच स्नानासाठी गरम पाणी, करमणुकीसाठी रेडिओ तसेच टीव्ही, सिनेमा, वाचनासाठी पुस्तके, कॅरम, बुद्धिबळ, पत्ते अशा खेळांची सोय तसेच टेबल टेनिस, बॅडमिंटनची ही सोय करण्यात आली आहे. सुमारे सहा हजार चौरस फुटाची इमारत यासाठी बांधण्यात आली आहे.
वॉकिंग ट्रॅक ,छोटीशी बाग, बसण्यासाठीची जागा, भजन, कीर्तन आणि प्रवचन असे धार्मिक कार्यक्रम तसेच वाढदिवस आणि सण साजरा करणे तसेच रविवारी छोटी सहल असे विविध कार्यक्रम “आनंद सहजीवन”मध्ये राबविण्यात येणार आहेत . जर ज्येष्ठ नागरिकांना काही मर्यादित काळासाठी येथे राहायचे असेल तर त्यांचीसुद्धा सोय करण्यात आली आहे. बऱ्याच वेळा एकत्र कुटुंबातील मुलांना बाहेरगावी जायचे असते .परंतु वृद्धपणामुळे आई-वडिलांना नेता येत नाही .अशा वृद्धांची सोय येथे करण्यात आली आहे .आधार विश्वस्त संस्था गेली वीस वर्षे रुग्णांना आधार देत आहे .त्यांना आयुर्वेदिक ,होमिओपॅथिक, नॅचरोपॅथी उपचार केले जातात .याशिवाय गंभीर आजारांवर डॉक्टर बोलावून त्यांची विशेष काळजी घेण्यात येते. याशिवाय गरज असणाऱ्यांना फिजिओथेरपी सेवा देण्यात येते.
या संस्थेच्यावतीने निराधारांना आधार दिला जातो .त्यांना सर्व उपचार व सेवा विनामूल्य दिली जाते. सध्या या ठिकाणी २० निराधार राहत आहेत.तर ४० जणांना पेड सेवा देण्यात येत आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे . सहा हजार स्क्वेअर फूट जागेत प्रशस्त इमारत बांधण्यात येत आहे.संस्थेने ३० लाख रुपये जमा केले असून यासाठी प्रा.ए. डी. जोशी यांनी सुमारे ५० लाख रुपये देणगी दिली आहे.आज हा प्रकल्प पूर्ण झाला आहे.या प्रकल्पात २८ जणांना राहण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे प्रा.ए.डी. जोशी यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला जयनारायण भुतडा,डॉ.प्रतिक शिवगुंडे,सतीश मालू ,अविनाश मार्तंडे उपस्थित होते.
आधारमध्ये मिळणाऱ्या सुविधा –
अंथरुणातल्या रुग्णांची काळजी घेणे. पॅरालिसीस , फॅक्चर, पार्किसन्स, मधुमेह, मनोरुग्णासारख्या व्याधीग्रस्त रुग्णांची सेवा.रुग्णांसाठी २४ तास प्रशिक्षित नर्सेसकडून देखभाल. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहार,व्यवस्था व औषधोपचार. आयुर्वेदिक,होमिओपॅथि,नॅचरोपॅथी उपचारांचा वापर.आजार गंभीर झाल्यास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची सोय.
Leave a Reply