Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9 News

नवा ‘मिठाचा सत्याग्रह
पुढच्या दहा-वीस वर्षांत जगातील लाखो प्राण, कोट्यवधी आजारपणं आणि उपचारांचे अब्जावधी रुपये वाचवायचे असतील तर मिठाचे दैनंदिन सेवन तातडीने निम्म्यावर आणायची गरज आहे. मात्र, ही हाक ऐकायला कुणीही तयार नाही. हा नवा ‘मिठाचा सत्याग्रह’ केल्याशिवाय मानव जातीला तरणोपाय नाही. पण हे कळणार कधी?

‘शोले’ या सर्वकालीन हिट सिनेमात गब्बर म्हणजे अमजद खान ‘तेरा क्या होगा कालिया?’ असा प्रसिद्ध प्रश्न विचारतो. त्याला कालिया ‘सरदार, आपका नमक खाया है…’ असे उत्तर देतो. ‘नमक खाया है, अब गोली खा..’ असे त्यावर गब्बर पिस्तुल नाचवत म्हणतो. या प्रसंगाचा वापर करून काही डॉक्टर जास्त मीठ खाल तर बीपीची किंवा इतर गोळी खावी लागेल, असे सांगत असत. मात्र, हे मिठाचे प्रकरण झपाट्याने गंभीर होत असून ते औषधाच्या गोळीपुरते मर्यादित राहणारे नाही. उलट, दिवसेंदिवस जगभरातील वाढत्या सेवनामुळे मीठ हे जणू जीवन संपविणारी गब्बरच्या पिस्तुलातील खरीखुरी गोळी बनत चालले आहे.

जागतिक आरोग्य संघटना’ (डब्लूएचओ) गेली काही वर्षे सातत्याने याबाबत जगाच्या कानीकपाळी ओरडत आहे. मात्र, तयार किंवा रेडी टू मेक खाद्यपदार्थांच्या कंपन्या, मिठाचा बेछूट वापर करणारी भारतासहित जगभरातील उपहारगृहे, फास्ट फूडचा वाढता कब्जा आणि बहुतेक देशांच्या सरकारांची उदासीनता यामुळे हा मिठाचा फास हळूहळू आवळत चालला आहे.
 हे मीठ म्हणजे आपण रोज खात असलेल्या ‘सोडियम क्लोराईड’मधील सोडियम.
 

 

      जागतिक आरोग्य संघटनेने दोन दिवसांपूर्वीच जारी केलेल्या नव्या इशाऱ्यात म्हटले आहे की, काहीही खर्च न करता, केवळ मिठावरचा हात आखडता घेतला तर पुढच्या सात वर्षांमध्ये ७० लाख प्राण वाचवू शकू.आसं हा इशारा काही आज देत नाहीये.

गेली अनेक वर्षे वेळोवेळी सावध करीत आहे. आश्चर्य म्हणजे, जगातील एकाही विकसित किंवा महासत्ता झालेल्या किंवा बनल्याची शेखी मिरवणाऱ्या देशाने हा इशारा ऐकलेलाच नाही. आपल्या देशातील नागरिकांच्या आहारातील मिठाचे-सोडियमचे प्रमाण मर्यादेत राहावे, यासाठी नव्याने अन्न व आहार धोरण तयार करणाऱ्या अवघ्या नऊ देशांची नावे पाहा. ब्राझील, चिली, चेक रिपब्लिक, लिथुआनिया, मलेशिया, मेक्सिको, सौदी अरेबिया, स्पेन आणि उरुग्वे हे ते नऊ देश आहेत.
जाआसंचे महासंचालक डॉ. त्रेदॉस अधनॉम गेब्रियेसस यांनी, ‘जगातील बहुसंख्य देश सोडियमच्या वापरावर कठोर निर्बंध न आणून आपल्याच नागरिकांचे प्राण का पणाला लावत आहेत, हेच समजत नाही,’ अशा शब्दांत आपला त्रागा व्यक्त केला आहे. मिठाच्या अती सेवनाने रक्तदाब वाढतो, हे आपल्याला माहीतच आहे. पण हृदयविकाराचा किंवा अर्धांगवायूचा झटका येण्यामागेही मिठाचा मारा हे एक कारण असू शकते, हे आपण कुठे लक्षात ठेवतो?

गेल्या वर्षी जाआसंने मिठाच्या वापरावर असणारे निर्बंध लक्षात घेऊन जगातील देशांचे पाच गटांमध्ये वर्गीकरण केले. त्यात भारताचे स्थान खालून दुसरे होते. अर्थात, भारताच्या जोडीला रशिया, नॉर्वे, सेनेगल, इराण, इराक असे सर्व प्रकारचे इतर बरेच देश आहेत. या देशांमध्ये मिठाच्या वापराबाबत लोकजागर करण्यावर भर आहे. म्हणजे, लोकांनीच शहाणे व्हावे, मिठाचे तोटे समजावून घ्यावेत आणि आहार संतुलित ठेवावा, अशी अपेक्षा आहे. हे एकवेळ नॉर्वेसारख्या देशाबाबत समजावून घेता येते.

पण भारतीय ग्राहक असा शहाणा व्हायला शंभर वर्षेही पुरणार नाहीत.

अशावेळी काय करायचे, हा प्रश्न जगातील डॉक्टर तसेच धोरणकर्त्यांच्याही पुढे आहे. त्यावरचा पहिला मार्ग म्हणजे मोठ्या प्रमाणात जेवण तयार होणाऱ्या ठिकाणी जागृती करायची. म्हणजे समजा लष्करांनी सैनिकांना, विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना, कारखान्यांनी कामगारांना, रुग्णालयांनी रुग्णांना आधी कमी मिठाच्या जेवणाची सवय लावायची. भारतात प्रसादभोजन देणाऱ्या देवस्थानांपर्यंत जरी हा संदेश पोहोचला तरी रोज लक्षावधी जेवणे कमी मिठाची बनतील.
वैज्ञानिक विचार केला तर मानवी शरीराला रोज दोन ग्रॅम सोडियम पुरेसे होते. म्हणजे, आपण खात असलेले सोडियम क्लोराईड-मीठ जास्तीत जास्त पाच ग्रॅम. प्रत्यक्षात जगात गरजेच्या दुप्पट, अडीच पट, तिप्पट सोडियम रोज खाणारे कोट्यवधी लोक आहेत. त्यात अर्थातच भारतीय अग्रेसर आहेत.

आज जगाची मिठाची दैनंदिन आहार सरासरी १०.८ ग्रॅम आहे. म्हणजे ती तातडीने निम्मी तरी व्हायलाच हवी. हृदयविकार आणि अर्धांगवायू हे धोके समजल्यानंतर जगातील अनेक संशोधन संस्थांनी मिठामुळे इतर काही आरोग्य समस्या उद्भवतात का, याचे संशोधन सुरू केले. त्याचे निष्कर्षही धक्कादायक आहेत. स्थूलपणा, हाडे ठिसूळणे, मूत्रपिंड विकार आणि जठराचा कर्करोग यांचाही संबंध मिठाच्या अतिसेवनाशी आहे, हे वैज्ञानिकांच्या लक्षात आले आहे. ही धोक्याची घंटा पाहता आता जगभर नव्या अर्थाने ‘मिठाचा सत्याग्रह’ सुरू होण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *