MH13 News Network
सोलापूर :- भारत सरकार मार्फत नशामुक्त भारत अभियानअंतर्गत महाराष्ट्र राज्यातून सोलापूर जिल्ह्याची निवड झालेली आहे. व्यसनमुक्त सोलापूरसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, त्याच्या प्रचार प्रसिद्धीसाठी ब्रँड अँबेसिडर नेमण्यात येणार आहेत. तरी इच्छुक कलाकार व खेळाडुंनी समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद येथे १५ एप्रिलपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
पत्रकात म्हटले आहे, व्यसनमुक्त सोलापूर उपक्रमासाठी जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आलेली आहे. या समितीमार्फत व्यसनमुक्त सोलापूरसाठी वेगवेगळ्या उपक्रमांचे नियोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये सर्व महाविद्यालये, माध्यमिक शाळा, सार्वजनिक ठिकाणे जसे एसटी स्टॅंड, रेल्वे स्टेशन, वाड्या – वस्त्या व कामगाराची वस्ती अशा ठिकाणी प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविणे व पथनाट्यांचे आयोजन करणे यांचा समावेश आहे. अशा सर्व अभियानासाठी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात प्रसिद्धी करणे, याकरिता संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून विविध कलाक्षेत्र व क्रीडा क्षेत्रातून प्राविण्य मिळविलेल्या इच्छुक कलाकार व खेळाडू यांनी ब्रँड अँबॅसिडरसाठी या कार्यालयात दिनांक १ ते १५ एप्रिल या कालावधीत आपण मिळवलेल्या विविध कला व क्रीडा क्षेत्रातील प्राविण्याच्या उल्लेखासह अर्ज सादर करावेत जेणे करून आपणास या संधीचा लाभ घेता येईल.