राज्यातील सर्वसामान्य नागरिक हाच आरोग्यविषयक योजनांचा केंद्रबिंदू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Big9 News

जागतिक आरोग्य दिनानिमित्त राज्यातील जनतेला मुख्यमंत्र्यांकडून निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा!; आरोग्य विभागामार्फत आजपासून राज्यात ‘सुंदर माझा दवाखाना’ उपक्रम

     राज्यातील सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवून आरोग्यविषयक विविध योजना राबविल्या जात आहेत, असे सांगत आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. आजपासून राज्यात आठवडाभर ‘सुंदर माझा दवाखाना’ हा उपक्रम सुरू होत  असून सामान्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यानिमित्ताने केले आहे.

आरोग्यविषयक आव्हानाला ताकदीने सामोरे जाणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य कर्मचारी यांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात आरोग्याचा प्रकाश आणला आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत गेल्या नऊ महिन्यांत ६२०० रुग्णांना एकूण ५० कोटी ५५ लाख रुपयांची मदत दिली आहे. माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात ४ कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार करण्यात आले. महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत विमा संरक्षण दीड लाखांवरून पाच लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पाच लाख रुपयांपर्यंत उपचार घेता येणार आहे. शिवाय या योजनेत नवीन २०० रुग्णालयांचा  समावेश करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

दरवर्षी ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. ‘समान आरोग्य सेवा’ हे यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाचे घोषवाक्य आहे. शासकीय रुग्णालये आणि आरोग्य संस्थांमध्ये सर्वांना समान सुविधा उपलब्ध करून जास्तीत जास्त रुग्णांनी सार्वजनिक रुग्णांलयांच्या सुविधांचा वापर केला पाहिजे, याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने या निमित्त या वर्षी  राज्यातील सर्व सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये स्वच्छता मोहीम राबवत ७ ते १४ एप्रिल दरम्यान ‘सुंदर माझा दवाखाना’ हा उपक्रम राज्यभर राबविणार आहे. त्यामाध्यमातून सामान्यांना आरोग्याच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.