MH13 News Network
सोलापूर, दि. 8 (जि. मा. का.) : सामाजिक न्याय विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त राज्यभरात दि. 01 एप्रिल ते 01 मे या महिनाभराच्या कालावधीदरम्यान सामाजिक न्याय पर्व साजरे केले जात आहे. या पार्श्वभूमिवर जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत सदर कालावधीत विविध सामाजिक उपक्रम घेण्याचे नियोजन केले आहे. जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री.सुनिल खमितकर यांनी ही माहिती दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम आयोजित केले आहेत. यामध्ये महात्मा फुले जयंतीनिमित्त अवयवदान विषयावर व्याख्यान, जि. प. प्राथमिक व माध्यमिक शाळेमधील विद्यार्थ्यांना जातीचे दाखले वाटप, कै. लक्ष्मीबाई पाटील मुलींचे वसतिगृह सोलापूर येथे 18 तास अभ्यास करणे उपक्रम, रक्तदान शिबिर, ज्येष्ठ नागरिकांचे व ऊसतोड कामगारांचे आरोग्य शिबिर, आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांचे सत्कार आदिचा समावेश आहे. हे उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य विभागासह तालुका स्तरावरील प्रमुख अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. या उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.