- MH13 News Network
सोलापूर – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नागनाथ चौगुले, शासकीय वसतिगृहाच्या महाविद्यालयीन विद्यार्थिनी तसेच उपस्थित मान्यवरांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुषहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
महात्मा ज्योतिबा फुले पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन पर्यंत अभिवादन रॅली काढण्यात आली. सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले व उपस्थित मान्यवरांच्या वतीने रॅलीस हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या रॅलीमध्ये शासकीय वसतिगृह सोलापूर, समाज कार्य महाविद्यालय व विजाभज आश्रमशाळेतील विद्यार्थी व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता.
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनानिमित्त सांस्कृतिक सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. रविंद्र चिंचोळकर यांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारीत प्रबोधनपर व्याख्यान दिले. तसेच मनिषा चव्हाण यांनी मी सवित्रीबाई बोलतेय ही एकपात्री एकांकिका सादर केली.
सदर कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय सोलापूर येथील अधिकारी व कर्मचारी, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य व विभागप्रमुख, आश्रमशाळेतील कर्मचारी, सर्व तालुका समन्वयक, जिल्हा प्रकल्प अधिकारी बार्टी, व समतादूत उपस्थित होते. सुत्रसंचालन सहशिक्षक दत्तात्रय बनसोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन समतादूत राजश्री कांबळे यांनी केले.