Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9 News

हमखास उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेतीने उंचावले सौदागर पांडव यांचे जीवनमान

      पारपंरिक शेतीला पर्याय म्हणून रेशीम शेतीकडे पाहिले जाते. सोलापूरसारख्या दुष्काळी जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी रेशीमशेतीने स्वतःचे जीवनमान उंचावले आहे. मोहोळ तालुक्यातील सौदागर पांडव हे त्याचेच एक उदाहरण… साधारण १० ते १२ वर्षांपूर्वी पारंपरिक शेती व कृषिपूरक व्यवसायांतून वार्षिक दीड लाख रूपये उत्पन्न घेणारे श्री. पांडव आज वार्षिक एकरी सहा ते सात लाख रुपये रेशीम शेतीमधून सहज मिळवित आहेत.

      मोहोळ तालुक्यातील मौजे पिरटाकळी येथे राहणाऱ्या श्री. पांडव यांनी बारावीनंतर कृषि पदविकेचे शिक्षण घेतले. शिक्षणानंतर नोकरीच्या मागे न लागता शेतीची आवड असल्याने वडिलोपार्जित 5 एकर क्षेत्र शेतीमध्ये भरीव उत्पन्न घेण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला शेतीचे उत्पन्न वाढण्यासाठी कुक्कुटपालन, शेळीपालन व दूधव्यवसाय इ. शेतीपूरक व्यवसाय ते करीत असत. परंतु, दैनंदिन कामे करूनही सहजासहजी उत्पन्नात वाढ होत नव्हती. शाश्वत व हमखास उत्पन्नाची हमी नव्हती. त्यामूळे ते चांगल्या शेतीनिगडीत नवीन सुयोग्य शेतीपूरक व्यवसायाच्या शोधात होते.

       याबाबत श्री. पांडव म्हणाले, मी दर महिन्याच्या एकादशीला वडिलांबरोबर पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जात असे. एका एकादशीला मंदिरात दर्शनासाठी जाताना रेशीम कोष खरेदी केंद्र येथे रेशीम कोष विक्री पासून शेतकरी उत्पन्न मिळवत असल्याचे निदर्शनास आले. तेथे उपस्थित शेतकऱ्यांची भेट घेऊन नंतर प्रत्यक्ष पाहणी केली. माझ्या कृषि पदविकेच्या अभ्यासक्रमामध्ये रेशीम शेतीबद्दल माहिती अभ्यासली होतीच. त्यामुळे हमखास व शाश्वत उत्पन्न देणारी रेशीम शेती करण्याचा मी निर्णय घेतला.

       कुक्कुटपालन – शेळीपालन – दुधव्यवसाय यापेक्षा कमी जोखीम असल्याने व कमी श्रमात, कमी खर्चात रेशीम शेतीमध्ये सहजासहजी हमखास व शाश्वत उत्पन्न मिळत गेल्याने सौदागर पांडव यांना रेशीम शेतीची आवड निर्माण झाली. याबाबत अधिक माहिती देताना श्री. पांडव म्हणाले, माझे दैवत पांडुरंगाने रेशीम शेतीचा रस्ता दाखवल्याने व माझे वडीलदेखील पांडुरंग यांनी सहमती दिल्याने मी सन 2007 मध्ये जिल्हा रेशीम कार्यालयाशी संपर्क साधला. त्यावेळी प्रचलित असलेले तुतीवाण एस – 1635 ची 1.00 एकर लागवड 3.5 x 1.5 फूट अंतराने केली. लागवडीनंतर बाजूला 20 फूट x 60 फूट चे कीटक संगोपन गृह उभारुन रेशीम शेती करू लागलो. त्याकाळी कोषाचे दर कमी असल्याने एकरी प्रती वर्षी एक लक्ष ते दीड लक्ष उत्पन्न मिळायचे. वेळोवेळी जिल्हा रेशीम कार्यालयाकडून भेटीदरम्यान होणारे समस्यांचे निराकरण व मार्गदर्शन यामुळे रेशीम शेतीमध्ये भरीव उत्पन्न मिळत गेले. याच दरम्यान 2014 साली मला जिल्हा रेशीम कार्यालयकडून सीडीपी योजनेतून कीटक संगोपन गृहासाठी रक्कम रु. 87 हजार 500 अनुदान मिळाले.

       रेशीम शेतीमध्ये अन्य कृषिपूरक व्यवसायासारखे दैनंदिन कष्ट नसून, महिन्याला एकदाच मार्केटिंग करायचे असते. तसेच, महिन्याला एकदाच कचरा (वेस्टेज) साफसफाई करावयाची असल्याने इतर शेतीची कामे करून रेशीम शेती करणे सोयीचे झाले झाल्याचे श्री. पांडव सांगतात. शिवाय, कुटुंबातील आई, वडील, एक भाऊ व त्यांची धर्मपत्नी यांच्या सहकार्याने काम होत असल्याने बाहेरील मजुरी खर्चाची बचत होते.

        रेशीम शेतीतील नफ्याबाबत सौदागर पांडव म्हणाले, सन 2007 साली एक ते दीड लाख रूपये माझे वार्षिक उत्पन्न होते. आता रेशीम शेतीमधील झालेल्या प्रगतीमुळे (चॉकी पुरवठा, फांदी पद्धत, निर्जंतुकीकरण पद्धती, तुतीचा पाला उच्च दर्जाचा येण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान आदिंमुळे आता प्रति महिना प्रत्येक पीक सरासरी दीड लाखाचे होत आहे व वार्षिक एकरी सहा ते सात लाख रु. मी रेशीम शेतीतून मिळवित आहे. सध्या माझ्याकडे दोन एकर रेशीम शेतीबरोबर दररोज उत्पन्न देणारे दुधव्यवसाय, कुक्कूटपालन व प्रति सहा महिन्यांनी उत्पन्न मिळणारे शेळीपालन व अन्य शेती पिके आहेत. परंतु, प्रत्येक महिन्याला नोकरीप्रमाणे उत्पन्न मिळणारी रेशीम शेती अन्य व्यवसायास पूरक असून फायदेशीर ठरत आहे. मी व माझे कुटुंब पूर्वी साध्या घरात राहत होतो. आता रेशीम शेतीमूळे त्याच ठिकाणी चांगले आरसीसी बंगला बांधून राहात आहोत व माझ्या भावास ट्रॅक्टर घेऊन दिला आहे. यापुढे मी संपूर्ण 5 एकरात तुती लागवड करून रेशीम शेती करण्याचा निश्चय केला आहे.

        श्री. पांडव यांना मौजे उपरीचे धनाजी साळुंखे यांच्यासह रेशीम विकास अधिकारी व्ही. पी. पावसकर, समूह प्रमूख शिवानंद जोजन यांचे उत्पन्न वाढीसाठी वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे.

         सौदागर पांडव यांच्यापासून प्रेरित होवून गावातील अन्य शेतकरी मनरेगा अंतर्गत गट करून उत्तम रेशीमशेती करीत आहेत. शिवाय त्यांच्या प्रकल्पास भेट देऊन मौजे कुरुल, सोहाळे, वाफळे, नरखेड, पापरी या आसपासच्या गावातील शेतकरी रेशीम शेती करीत आहेत. चांगले कोष उत्पादित करून उत्पन्न घेत आहेत.

         एकंदरीत श्री. पांडव यांच्याच शब्दात पंढरपूरच्या पांडुरंगाचे कृपेने सौदागर पांडव यांना रेशीम शेतीचा मार्ग दर्शविल्याने त्यांचे जीवनमान उंचावले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *