भाजपा युवा मोर्चाचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या फोटोला जोडे मारो आंदोलन
आरोग्य भरती परीक्षा ऐनवेळी रद्द केल्याने भाजयुमो आक्रमक
विद्यार्थ्यांचा मानसिक व आर्थिक छळ केल्याचा भाजयुमोचा आरोप
भाजपा युवा मोर्चा सोलापूर जिल्ह्याच्या वतीने सोलापूर शहर बस स्थानक येथे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. आरोग्य विभागाच्या भरतीची परीक्षा ऐनवेळी रद्द करून विद्यार्थ्यांना मानसिक व आर्थिक त्रास दिल्याच्या निषेधार्थ हिंगोली, परभणी, नगर, सातारा, कोल्हापूर, धुळे, पुणे आदी ठिकाणच्या संतप्त विद्यार्थ्यांना सोबत घेत भाजयुमो जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे व सुदर्शन यादव यांनी हे आंदोलन केले.
आरोग्य भरती परीक्षेसाठी राज्यातील 8 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते, त्यांची परीक्षा शनिवार 25 सप्टेंबर रोजी सकाळी होणार होती मात्र आदल्या दिवशी रात्री 10 वाजता परीक्षा रद्द झाल्याची घोषणा राजेश टोपेंनी केली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पावसाची तमा न बाळगता विद्यार्थी परीक्षा केंद्राच्या शहरात पोहचले असताना विद्यार्थ्यांची थट्टा करण्याचे काम सरकारने केले आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या नेत्यांना सामान्य विद्यार्थ्यांचे दुःख कळणार नाही. या दळभद्री सरकारला आणि आरोग्यमंत्री राजेश टोपेंना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, तातडीने विद्यार्थ्यांची माफी मागून राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी भाजयुमो जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांनी यावेळी बोलताना केली.
दरम्यान भाजयुमो जिल्हा सरचिटणीस सुदर्शन यादव यांनीही सरकारच्या गलथान धोरणांवर टीका करत राजेश टोपे यांचा निषेध व्यक्त केला. तातडीने परीक्षेची पुढची दिनांक जाहीर केली पाहिजे, आणि विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली पाहिजे. येणाऱ्या काळात सरकारने जर यांना न्याय दिला नाही तर भाजयुमो सोलापूर जिल्हा अजून आक्रमकपणे आंदोलन करेल असा इशाराही सुदर्शन यादव यांनी यावेळी बोलताना दिला.
यावेळी जिल्हा सचिव शिलवंत छपेकर, जिल्हा सचिव विशाल जाधव, अशोक कोडम, शरणू हांडे, अनुप कुलकर्णी आदी अनेक विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply