सोलापूर असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्सतर्फे भरविण्यात येणाऱ्या ‘स्थापत्य २०२३’ या बांधकाम व अंतर्गत सजावट विषयक प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी (दि.२४) नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर होणार आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शितल तेली – उगले यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता हा उद्घाटन सोहळा होणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अमोल मेहता यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यक्रमास सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, आयकॉन स्टीलचे संचालक श्याम दाड तसेच वितरक बालमुकुंद राठी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
प्रदर्शनाचे हे ११ वे वर्ष असून ‘लाईव्ह ग्रीन, सेव्ह ग्रीन’ ही यंदाच्या प्रदर्शनाची संकल्पना आहे. जलपुनर्भरण, सौरऊर्जा, वापरलेले पाणी शुद्ध करून ते झाडांसाठी वापरण्याचे तंत्रज्ञान, देशीगाईच्या शेणापासून तयार केलेल्या पर्यावरणपूरक वस्तू याबाबत यातून जागृती करण्यात येत आहे.
प्रत्येकालाच नवी इमारत बांधण्याची किंवा बांधलेली इमारत सजवण्याची इच्छा असते. मात्र योग्य अन् उपा युक्त माहिती अनेकदा मिळत नाही. स्थापत्य प्रदर्शनामध्ये एका छताखाली या विषयातील सर्व माहिती व मटेरियल्स उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्थापत्य २०२३ प्रदर्शनामध्ये एकूण ८० स्टॉल लावण्यात येत आहेत. यात इंजिनीयर, तंत्रज्ञ, बिल्डर्स, विकासक, व्यावसायिक, सिमेंट, स्टील, प्लंबिंग, सॅनिटरी मटेरियल, दरवाजे, खिडक्या, रुफिंग मटेरियल, टाइल्स, पडदे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स मटेरियल आदी विषयांच्या स्टॉलचा समावेश आहे, असे अध्यक्ष अमोल मेहता म्हणाले.
यंदाच्या प्रदर्शनामध्ये यूपीव्हीसी विंडोज, गाईच्या शेणापासून बनविलेले वैदिक प्लास्टर वॉल पट्टी व पेंट तसेच इ वाहन यांचे विशेष स्टॉल नागरिकांना माहिती देण्यासाठी उभारण्यात येत आहेत.
सोलापूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी स्थापत्य २०२३ प्रदर्शनास भेट द्यावी आणि बांधकाम व अंतर्गत सजावट विषयक अत्यंत उपयुक्त माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्सचे अध्यक्ष अमोल मेहता यांनी केले.
स्थापत्य प्रदर्शनाचा समारोप रविवार, २६ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता होणार असून या कार्यक्रमास रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि आयकॉन स्टीलचे संचालक दिनेश राठी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या पत्रकार परिषदेस प्रदर्शनाचे प्रायोजक आयकॉन स्टीलचे वितरक बालमुकुंद राठी, संघटनेचे उपाध्यक्ष प्रशांत मोरे, सचिव भगवान जाधव, खजिनदार सिद्धाराम कोरे, सहसचिव चंद्रमोहन बत्तुल, सहखजिनदार मनोज महिंद्रकर सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
- सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत राहणार प्रदर्शन
स्थापत्य २०२३ प्रदर्शन शुक्रवार २४ ते रविवार २६ फेब्रुवारीपर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री १० पर्यंत नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर हे प्रदर्शन पाहण्यास सोलापूरकरांसाठी उपलब्ध आहे. नागरिकांनी स्थापत्य २०२३ ला आवर्जुन भेट द्यावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.