Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9news Network

सोलापुरातील क्वारंटाइन सेंटर मधून एक कोरोना बाधित पळून गेल्याची घटना घडली आहे।

धर्मवीर संभाजी महाराज तलाव (कंबर तलाव) येथील केटरिंग कॉलेजमधील क्वारंटाइन सेंटरमधील शौचालयातून कोरोनाबाधित आरोपी फरार झाला. हा प्रकार शनिवारी सकाळी ८.३० ते ८.४५ वाजण्याच्या दरम्यान घडला. विजय कुंडलिक गायकवाड (वय २९, रा. मंगळूर नं. १, ता. माजलगाव, जि. बीड) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे.

विजय गायकवाड याच्या विरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गु.र.नं. २६५/२०२१ भादंवि कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अटक करण्यात आली होती, त्यानंतर मोहोळच्या सबजेलमध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान तो कोरोना पॉझिटिव्ह आल्याने उपचारासाठी सोलापुरातील केटरिंग कॉलेजच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल केले होते.
क्वारंटाइन सेंटरमधील रुग्णांना सकाळी नेहमीप्रमाणे उठवण्यात आले. सर्वांना प्रात:विधीसाठी शौचालयात पाठवण्यात आले. इतरांप्रमाणे विजय गायकवाड हादेखील शौचालयात गेला, मात्र तो बाहेर आलाच नाही. बराच वेळ झाला तरी तो बाहेर कसा आला नाही म्हणून तेथे बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना शंका आली.

ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी बाहेरून दरवाजा तोडला तेव्हा खिडकी उघडी होती. तो खिडकीतून पळून गेल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी तत्काळ आजूबाजूला व इतरत्र शोध घेतला, मात्र तो आढळून आला नाही. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अविराज सुरेश राठोड (नेमणूक मोहोळ पोलीस ठाणे) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तपास सहायक फौजदार टंकसाळी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *