ब्रेकिंग | जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे आदेश – जिल्हाधिकारी

Big9news Network

  • नागरिकांनी नेहमी योग्य पध्दतीने मास्क परिधान करावे
  •  जिल्ह्यात येणा-या सर्व प्रवाशांचे, एकतर यात यापुढे व्याख्या केल्यानुसार संपूर्ण लसीकरण केले जाईल किंवा त्यांनी ७२ तासांसाठी वैध असलेले आरटी-पीसीआर चाचणी प्रमाणपत्र बाळगणे बंधनकारक

सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील पत्र दि. १४ मार्च २०२० अन्वये कोरोना विषाणू (covid-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाटी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ मधील तरतुदींच्य अंमलबजावणीसाठी अधिसुचना निर्गमीत करणेत आलेली आहे, आणि त्याबाबतची नियमावली प्रसिद्ध केली असून जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोव्हीड-१९ वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.

महाराष्ट्र शासन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई

यांचेकडील  दि. २९ जून २०२० रोजीच्या आदेशामध्ये त्या त्या जिल्ह्यातील परिस्थिती प्रमाणे संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना जिल्ह्यातील रुग्ण स्थितीनुसार आदेश काढणेबाबत सर्वाधिकार देणेत आलेले आहेत. तसेच दि.२७ नोव्हेंबर २०२१ कोविड १९ विषाणूचा फैलाव होण्यास प्रतिरोध (प्रतिबंध) करण्यासाठी निर्बन्ध लावण्याचा संबंधातील राज्य शासनाने सुधारीत निर्देश जारी केलेले आहे.

यामध्ये सर्व आर्थिक, सांस्कृतिक , सामाजिक, क्रिडा व मानोरंजनाविषयक क्षेत्रातील कार्याना कोविड१९, सार्वत्रिक साथरोग येण्यापूर्वी, विविध स्थानिक किंवा इतर सक्षम प्राधिकरणांनी ठरविलेल्या सर्व साधारण वेळानुसार, तात्काळ  प्रभावाने पुढील शर्तीना अधीन राहून खुले करण्याचे आदेशीत केले आहेत.

त्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चं कलम १८८(१) (३) व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार कोरोना (कोविङ-१९) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडील प्राप्त निर्देशास अनुसरुन सोलापूर जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय सोलापूर ची हद्द वगळून) यापूर्वीचे सर्व आदेशाचे अधिक्रमण करुन, सर्व आर्थिक, सांस्कृतिक , सामाजिक, क्रिडा व मानोरंजना विषयक क्षेत्रातील कार्यांना कोविड १९ सार्वत्रिक साथरोग येण्यापूर्वी, विविध स्थानिक किंवा इतर सक्षम प्राधिकरणांनी ठरविलेल्या सर्व साधारण वेळानुसार, तात्काळ प्रभावाने पुढील शर्तीना अधीन राहून खुले करण्यास परवानगी देत असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेशित केले आहे.

  • कोविड अनुरुप वर्तनाचे (Covid Appropriate Behaviour) पालन :

राज्य शासनाचे व केंद्र सरकारने वेळोवेळी, निर्धारित केलेल्या कोविड अनुरुप वर्तनाचे (CAB) , सेवाप्रदाते, परिवास्तुंचे (जागांचे) मालक, परवानाधारक, अयोजक, इत्यादींसह सर्वांनी तसेच सर्व अभ्यागत, सेवा घेणारे, ग्राहक, अतिथी, इत्यादींनी काटेकोर पालन केले पाहिजे, कोविड अनुरुप वर्तनाची तपशीलवार मार्गदर्शक तत्वे तसेच त्याचे उल्लंघन केल्यास करावयाचे दंड, कोविड अनुरुप वर्तनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार आणि यात यापुढे नमूद केलेल्या दंडानुसार असेल,

  • संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता :

अ. तिकीट असलेल्या किंवा तिकीट नसलेल्या, कोणत्याही कार्यक्रमाच्या, समारंभाच्या किंवा प्रयोगाच्या अयोजनाशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्ती तसेच सर्व सेवा प्रदाते व सहभागी होणा-या व्यक्ती (जसे की, खेळाडू, अभिनेते, इत्यादी) अभ्यागत, पाहुणे, ग्राहक यांचे, यात यापूढे दिलेल्या व्याख्येनुसार, संपूर्ण लसीकरण केलेले असावे.

ब, जेथे जनतेतील कोणत्याही व्यक्तींना येण्याचा आणि सेवा घेण्याचा हक्क आहे असे कोणतेही दुकान,आस्थापना, मॉल समारंभ, संमेलन (मेळावे), इत्यादी ठिकाणी, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तीद्वारे व्यवस्थापन केले पाहिजे आणि अशा ठिकाणी येणारे सर्व अभ्यागत, ग्राहक यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असावे, क. सर्व सार्वजनिक परिवहन सेवांमध्ये, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तीनाच परवानगी असेल,

ड. राज्य शासनाने तयार केलेला युनिव्हर्सल पास (http://epassmsdma.mahait.org किंवा telegram- MahaGovUniversalPass Bot) हा, संपूर्ण लसीकरण झाल्याच्या स्थितीचा वैध पुरावा असेल. अन्यथा छायाचित्र असलेले वैध ओळखपत्र असलेले कोविड प्रमाणपत्र देखील त्यासाठी वैध पुरावा मानले जाईल. १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या नागरिकांसाठी, इतर शासकीय, संस्थेने किंवा शाळेने दिलेले छायाचित्र ओळखपत्र आणि वैद्यकिय कारणांमुळे ज्या व्यक्ती, लस घेऊ शकत नाहीत त्या व्यक्तींसाठी, प्रमाणित वैद्यकीय व्यावसायीकाकडील प्रमाणपत्र प्रवेशांसाठी कागदोपत्री पुरावा म्हणून वापरता येईल.

इ. जेथे सर्वसामान्य जनतेतील कोणतीही व्यक्ती भेट देत नाही अशी कार्यालये व इतर आस्थापना तसेच खाजगी परिवहन सेवा यांच्यासाठी, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी त्या खुल्या असण्याची शर्त नसली तरी, त्यांना देखील संपूर्ण लसीकरण करणे आवश्यक आहे.

  • जिल्ह्यात प्रवास :

सोलापूर जिल्ह्यात येणा-या सर्व प्रवाशांचे, एकतर यात यापुढे व्याख्या केल्यानुसार संपूर्ण लसीकरण केले जाईल किंवा त्यांनी ७२ तासांसाठी वैध असलेले आरटी-पीसीआर चाचणी प्रमाणपत्र बाळगणे बंधनकारक राहील.

  • कोणताही कार्यक्रम समारंभ,इत्यादींमधील उपस्थितीवरील निर्बंध :

अ. चित्रपट गृह, नाटयगृह,मंगलकार्यालय सभागृह इत्यादी बंदिस्त/बंद जागेत घेण्यात येणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाच्या समारंभाच्या/उपक्रमाच्या बाबतीत.जागेच्या क्षमतेच्या ५० टक्के लोकांना परवानगी दिली जाईल.

ब. संपूर्ण खुल्या असलेल्या (open to sky) जागांच्या बाबतीत,कोणत्याही समारंभासाठी किंवा संमेलनांसाठी तेथील जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के लोकांना परवानगी दिली जाईल. संमेलनाच्या किंवा समारंभाच्या अशा ठिकाणांच्या बाबतीतील क्षमता, औपचारिकपणे आधीच निश्चित केलेली नसेल तर (स्टेडियम प्रमाणे), संबंधित Incident Commander तथा उपविभागीय अधिकारी यांना अशी क्षमता ठरवण्याचा अधिकार असेल,

क. जर वरील नियमांनुसार कोणत्याही संमेलनासाठी (मेळाव्यासाठी) उपस्थित असलेल्या एकूण लोकांची संख्या एक हजारांपेक्षा अधिक असेल तर, अशा बाबतीत, स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला त्याची माहिती द्यावी लागेल आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अशा कोणत्याही संमेलनाचे (मेळाव्याचे) निरिक्षक म्हणून पर्यवेक्षण करण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी पाठवतील. आणि तेथे वर नमूद केलेल्या नियमांचे काटेकोरपणे अनुपालन केले जात असल्याची खात्री करतील.कोविड-१९ च्या प्रसाराचा धोका लक्षात घेता, तेथे कोविड अनुरूप वर्तनाचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले तर, Incident Commander तथा उपविभागीय अधिकारी यांच्या प्रतिनिधीला, कार्यक्रम पूर्णत: किंवा अंशत: बंद करण्याचे आदेश देण्याचा प्राधिकार असेल.

  •  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे इतर वाजवी निर्बंध :

कोणत्याही Incident Commander तथा उपविभागीय अधिकारी यांना जर योग्य वाटल्यास, कोणत्याही क्षणी,त्यांच्या संबंधित अधिकार क्षेत्रासाठी,यात नमूद केलेले निबंध व शर्ती वाढविता येतील,परंतू कमी करता येऊ शकणार नाहीत. मात्र, जाहीर नोटीसीद्वारे ४८ तासांची पूर्व सूचना दिल्याशिवाय तसे करता येणार नाही.

  •  संपूर्ण लसीकरण व्याख्या :

संपूर्ण लसीकरण झालेली व्यक्ती याचा अर्थ-

लसीच्या दोन्हीही मात्रा (डोस) घेतलेल्या आहेत आणि दुसरी मात्रा (डोस) घेतल्यानंतर १४ दिवस झालेले आहेत.

अशी कोणतीही व्यक्ती, असा आहे, किंवा  ज्या व्यक्तीचे वैद्यकीय स्थिती अशी आहे की, ज्यामुळे त्याला किंवा तिला लस घेण्यास मुभा नाही आणि त्या व्यक्तीकडे तशा अर्थाचे मान्यताप्राप्त डॉक्टरांकडील प्रमाणपत्र आहे अशी कोणतीही व्यक्ती,असा आहे, किंवा १८ वर्षापेक्षा कमी वयाची व्यक्ती, असा आहे.

  •  कोविड अनुरूप वर्तनविषयक नियम व दंड :

व्याख्या : कोविड १९ विषाणूचा प्रसार होण्यास प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यामुळे त्याच्या प्रसाराची साखळी खंडित करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने व संस्थेने पालन करण्याची गरज असलेने दैनंदिन सामन्य वर्तन अशी कोविड अनुरूप वर्तन (CAB) या संज्ञेशी व्याख्या करता येऊ शकेल, ज्यांचे कोविड अनुरूप वर्तन (CAB)म्हणून वर्णन केले जाते अशा वर्तनाच्या पैलूंमध्ये,खाली नमूद केलेल्या वर्तनांचा समावेश होतो आणि कोविड १९ विषाणूचा प्रसार होण्यास जे अडथळा निर्माण करू शकतील अशा सर्व तर्कसंगत पैलूंचा देखील समावेश होतो, त्यात नमूद केलेली त्याच्या प्रसाराची कार्यपध्दती (methodology) दिलेली आहे.

मूलभूत कोविड अनुरूप वर्तनाचे काही पैलू पुढीलप्रमाणे असून त्यांचे प्रत्येकाने सदैव पालन केले पाहीजे, सर्व संस्थांनी हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की, त्यांचे सर्व कर्मचारी,त्यांच्या परिसरांत भेट देणार अभ्यागत, ग्राहक किंवा संस्थेच्या कोणत्याही कार्यक्रमात,प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, असहभागी होणारी कोणतीही व्यक्ती,त्याचे पालन करतील आणि त्यांच्या परिसरांमध्ये आणि / किंवा व्यवसायाशी संबंधित व्यवहार करताना किंवा संबंधित संस्थेशी असलेली अन्य कार्य करताना, त्यांची अंमलबजावणी करण्याकरीता संस्था उत्तरदायी असतील. त्यांच्या नियंत्रणाखाली किंवा जेथे ती संस्था आपला व्यवहार किंवा इतर कार्य करत असेल अशा सर्व ठिकाणी, अशा सर्व कर्मचाऱ्यांनी कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करण्यासाठी आवश्यक असलेल्या हॅन्ड सॅनिटायझर,साबण व पाणी, तापमापक (thermal scanner) इत्यादी गोष्टी उपलब्ध करण्यासाठी देखील जबाबदार आहेत.

  1.  नेहमी योग्य पध्दतीने मास्क परिधान करा नाक व तोंड नेहमी मास्कने झाकलेले असले पाहीजे. (रुमालाला, मास्क समजले जाणार नाही आणि रुमाल वापरणारी व्यक्ती, दंडास पात्र असेल.)
  2.  जेथे शक्य असेल तेथे, नेहमी सामाजिक अंतर (६ फुट अंतर ) राखा.
  3.  साबणाने किंवा सॅनिटायझरने वारंवार व स्वच्छपणे हात स्वच्छ धुवा.
  4.  साबणाने हात न धुता किंवा सॅनिटायझर न वापरता,नाक डोळे तोंड यांना स्पर्श करणे टाळा.
  5.  योग्य श्वसन स्वच्छता (आरोग्य) राखा.
  6.  पृष्टभाग नियमितपणे आणि वारंवार स्वच्छ व निर्जतुक करा.
  7.  खोकताना किंवा शिकताना,टिश्यू पेपरचा वापर करून तोंड व नाका झाका आणि वापरेले टिश्यू पेपर नष्ट करा. जर एखादयाकडे टिश्यू पेपर नसेल तर,त्याने स्वत:चा हात नव्हे तर, हाताचा वाकवलेला कोपर नाका तोंडावर ठेवून खोकावे व शिंकावे.
  8.  सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.
  9.  सार्वजनिक टिकाणी गर्दी टाळा आणि सुरक्षित अंतर (६ फुट अंतर ) राखा.
  10.  कोणालाही शारीरिक स्पर्श न करता, नमस्कार अभिवादन करा.
  11.  कोविड-१९ विषाणूचा प्रसार टाळण्यासाटी आवश्यक असलेले अन्य कोणतेही तर्कसंगत वर्तन
  •   शास्ती /दंड –

या नियमानुसार अपेक्षित असलेल्या कोविड अनुरूप वर्तनाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला, असा कसूर केल्याच्या प्रत्येक प्रसंगी, रुपये ५००/- इतके दंड करण्यात येईल. ज्यांनी, आपले अभ्यागत, ग्राहक इत्यादीवर कोविड अनुरूप वर्तन लादणे अपेक्षित आहे अशा संस्थेच्या किंवा आस्थापनेच्या कोणत्याही परिवास्तृत (जागेत), जर एखादया व्यक्तीने कसूर केल्याचे दिसून आले तर, त्या व्यक्तीवर दंड लादण्याव्यतीरिक्त अशा संस्थांना आस्थापनांना सुध्दा रुपये १०,०००/-इतका दंड करण्यात येईल. जर कोणतीही संस्था किंवा आस्थापना तिचे अभ्यागत, ग्राहक इत्यादींमध्ये कोविड अनुरूप वर्तन विषयक शिस्त निर्माण करण्याची सुनिश्चित करण्यात नियमितपणे कसूर करीत असल्याचे दिसून आले तर, एक आपत्ती म्हणून कोविड १९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत, अशी संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल, जर एखादया संस्थेने किंवा आस्थापनेने, स्वत:च कोविड अनुरूप वर्तनाचे (CAB) किंवा प्रमाण कार्यचालन कार्यपध्दतीचे (SOP) पालन करण्यात कसूर केली तर. ती, प्रत्येक प्रसंगी, रुपये ५०,०००/- इतक्या दंडास पात्र असेल वारंवार कसूर केल्यास एक आपती म्हणून कोविड १९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत, अशी संस्था  किंवा आस्थापना बंद करण्यात येईल. जर कोणत्याही टेक्सीमध्ये किंवा खाजगी वाहतूक करणा-या चारचाकी वाहनात किंवा कोणत्याही बसमध्ये, कोविड अनुरूप वर्तनात कसूर केली जात असल्याचे आढळून आले तर, कोविड अनुरूप वर्तनात कसूर करणाऱ्या व्यक्तींना रूपये ५००/- इतका दंड करण्यात येईल, तसेच सेवा पुरविणारे वाहनचालक मदतनीस किंवा वाहक यांना देखील रुपये ५००/-  इतका दंड करण्यात येईल. बसेसच्या बाबतीत, मालक परिवहन एजन्सी कसुरीच्या प्रत्येक प्रसंगी रूपये १०,०००/- इतका दंड करण्यात येईल. वारंवार कसूर केल्यास, एक आपत्ती म्हणून कोविड -१९ अधिसूचना अंमलात असेपर्यंत मालक एजन्सीचे लायसन काढून घेण्यात येईल किंवा तिचे परिचालन बंद करण्यात येईल.

कोविड अनुरूप वर्तणूकी संबंधीच्या वर नमूद केलेल्या नियमांचे , अनिवार्यपणे पालन करण्यात येईल आणि त्यांचे उल्लंघन केल्यास वर नमूद केल्यानुसार दंड व शास्ती करण्यात येईल तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार ग्रामीण भागात गट विकास अधिकारी तसेच नागरी भागात संबंधित मुख्याधिकारी नगरपालिका/नगरपंचायत यांच्या प्राधिकरणास तसेच कोणत्याही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे उल्लंघन करणाऱ्यांवर इतर कोणताही दंड किंवा शास्ती लादता येईल. कोविड अनुरूप वर्तनाचे नियम/धोरणे,वरीलप्रमाणे असतील आणि त्यामध्ये विशेषरित्या नमूद न केलेले कोविड अनुरूप वर्तनाशी संबंधित असणारे इतर कोणतेही विषय/मुद्दे, राज्य शासनाच्या अंमलात असलेल्या प्रचलित नियमानुसार/ आदेशांनुसार असतील.

या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती/ संस्था अथवा संघटना यांचेवर भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ मधील तरतूदीनुसार दंडनिय/ कायदेशीर कारवाईस पात्र असून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतूदी आणि इतर कायदे आणि विनियम यानुसार कारवाई करणेत येईल. अशा व्यक्ती, संस्था अथवा संघटना यांचे विरुद्ध संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी कारवाई करावी, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेशित केले आहे.