सोलापूर दि:- संजय तुळजीराम मल्लाव,उ.व.34,रा:-कोळेगाव ता:- मोहोळ,जिल्हा:-सोलापूर याचा मागील भांडणाचा राग धरून खून केल्याप्रकरणी राजू उर्फ राजकुमार गुंडेराम भोई,उ.व. 24,रा:- औराद, ता.द.सोलापूर याची जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री एस.एस. जगताप यांनी निर्दोष मुक्तता केली.
यात हकीकत अशी की, यातील मयत संजय मल्लाव हा कोळेगाव ता.मोहोळचा रहिवासी होता,दिनांक 22/04/2018 रोजी त्याला आरोपीने फोन करून घराबाहेर बोलावले व टमटम मध्ये बसवून घेऊन गेले.ही गोष्ट मयताची पत्नी सुरेखा हिने पाहिली होती. तद्नंतर त्याच रात्री मयत संजय,आरोपी राजू व त्याचा आणखी एक साथीदार बालाजी भोई यांनी एकत्र मद्यपान केले व आणखीन मद्याची मागणी करणेकरीता लांबोटी येथील हॉटेल गौरी येथे गेले असता, हॉटेल मालक पंडित नरुटे याने नकार देऊन पाठवून दिले,तद्नंतर ते तिघेही दारूच्या नशेत एकमेकांशी भांडण करीत तेथून जवळच असलेल्या पाण्याच्या डबक्याकडे गेले तेथे आरोपी राजू व त्याचा साथीदार बालाजी याने मयतास डबक्याचे पाण्यात बुडवले व तेथून पोबारा केला. संजय हा जागेवर मयत होऊन पडला. दुसऱ्या दिवशी गावातील लोकांनी प्रेत पाहून कळवले, त्यावरून मयताची पत्नी फिर्यादी सुरेखा हिने मोहोळ पोलिस ठाण्यात आरोपी व त्याचे साथीदार विरुद्ध फिर्याद दिली. त्याचा तपास मोहोळ पोलीस ठाण्याचे तत्कालीन ए.पी.आय दत्तात्रय निकम व विक्रांत बोधे यांनी करून दोषारोपपत्र दाखल केले होते.यातील दुसरा आरोपी हा अज्ञान असल्यामुळे त्याचा खटला स्वतंत्ररित्या बाल न्यायालयात चालणार आहे. या खटल्यात सरकार तर्फे एकदंर 12 साक्षीदार तपासण्यात आले.
खटल्याच्या सुनावणीवेळी आरोपीचे वकील एडवोकेट मिलिंद थोबडे यांनी मयताची आई व पत्नी यांनी उलट तपासात मयताचे व आरोपीचे यापूर्वी कधीही भांडणे नसल्याचे तसेच मयत व आरोपी यांना एकत्रित शेवटी पाहिल्याचे साक्षीदारांचा पुरावाही संशयास्पद असल्याचे उलट तपासात स्पष्ट झाल्याचा युक्तिवाद मांडला. तो ग्राह्य धरून न्यायाधीशांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
यात आरोपीतर्फे ऍड. मिलिंद थोबडे ,ऍड. विनोद सूर्यवंशी,ऍड. दत्ता गुंड,ऍड.आमित सावळगी यांनी तर सरकार तर्फे ऍड.एस.ए. क्यातम यांनी काम पाहिले.