जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मंगळवारी पोषण आहार महिन्याचे आयोजन करण्याबाबत चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते यावेळी सीईओ स्वामी चर्चासत्रात बोलत होते. कुपोषण निर्मूलनासाठी सप्ताह अथवा पंधरवडाचे आयोजन करण्याऐवजी संपूर्ण महिनाभर कालबध्द कार्यक्रम राबवून सोलापूर जिल्हा कुपोषण मुक्त करण्यासाठी कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यासाठी हे चर्चासत्र आयोजित केलेले आहे. सर्वप्रथम कुपोषणाबाबत लोकांचे असलेले गैरसमज आपणास दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे.
या चर्चासत्रास महिला व बालकल्याण कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता गोरख शेलार, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ अनिरुद्ध पिंपळे, उपकार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा सुनील कटकधोंड, सर्व तालूक्यातील बालविकास अधिकारी व अंगणवाडी पर्यवेक्षिका उपस्थित होते.
पुढे बोलताना सीईओ स्वामी यांनी पोषण आहार महिना दशसुत्रींवर आधारीत असल्याचे सांगितले.
मुलांमधील कुपोषण निर्मूलनाचा दशसूत्री कार्यक्रम
1- गरोदर माता व महिलांचे कोविड-19 तसेच नियमित लसीकरण पूर्ण करून घेणे.
2- जलकृती दिवस- यामध्ये जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांना नळजोडणी करून घेणे जेणेकरून मुलांना स्वच्छ पाणी पिण्यास मिळेल.
3- संवाद गरोदर मातेंशी- यामध्ये गरोदर व स्तनदा माता यांना प्राथमिक आरोग्य केंद्र व केंद्राचे ठिकाणी बोलावून व कोणाचे सर्व नियम पाळून आर बी एस के वैद्यकीय अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनी त्यांच्याशी वार्तालाप करणे.
4- गृहभेटी- यामध्ये लाभार्थ्यांच्या घरी अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचारी भेट देऊन कुटुंबांशी संवाद साधतील.
5- सॅम/मॅम बालक शोध मोहीम
6- शाळापूर्व शिक्षण दिवस- यामध्ये अंगणवाडी मधील मुलांना शाळापूर्व शिक्षण देणेचा समावेश असेल.
7- कुपोषित बालकांच्या पालकांशी संवाद दिवस- यामध्ये पालकांमध्ये उपोषणा संदर्भात असलेले गैरसमज दूर करणे, कुपोषण हे फक्त गरीब कुटुंबातील मुलांनाच होते हा चुकीचा समज दूर करून मुलांच्या पोषणा बाबत वैद्यकीय अधिकारी पालकांना मार्गदर्शन करतील.
8- वेबिनार दिवस- यामध्ये बीट निहाय मुलांचे पोषण, बालमृत्यू, योग्य रीतीने स्तनपान याबाबत पालक व स्तनदा /गरोदर मातांचे वेबिनार द्वारे मार्गदर्शन करणे.
9- गावनिहाय स्तनदा मातांचे मार्गदर्शन
10- आहार व पोषण मार्गदर्शन, पाककृती स्टॉल यामध्ये महिला बचत गटांचा सहभाग असेल.
हा दशसूत्री कार्यक्रम आरोग्य विभाग, महिला बाल कल्याण विभाग, ग्रामपंचायत विभाग व शिक्षण विभाग यांनी एकत्रितपणे राबवायचा आहे.
यावेळी सोमवारी राखी पौर्णिमेनिमित्त महिलांचे लसीकरण उपक्रमाचे उत्कृष्टरित्या नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल डॉ. अनिरुद्ध पिंपळे जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी यांचे सीईओ स्वामी यांनी अभिनंदन केले. त्याचप्रमाणे दत्तक बाल श्रेणीवर्धन योजना अंतर्गत बावीस लक्ष एवढा लोकसहभाग गोळा करण्याचे मोठे काम अंगणवाडी पर्यवेक्षिका व सेविका यांनी केल्यामुळे त्यांचेही अभिनंदन सीईओ स्वामी यांनी केले व आणखी लोकसहभाग गोळा करण्याचा प्रयत्न करण्याचे आव्हान यावेळी स्वामी यांनी सर्व पर्यवेक्षकांना केले.
पोषणा बरोबरच मुलांना व पालकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याची गरज आहे. अस्वच्छतेमुळे होणारे आजार आपण टाळू शकलो तर कुपोषण निर्मूलनामधील एक प्रमुख अडथळा आपण दूर करू शकतो असे प्रतिपादन यावेळी स्वामी यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता यांनी आभार मानले.
Leave a Reply