Big9news Network
सोलापूर महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग नेहमी चर्चेत असतो. कधी ड्रेनेजचे चेंबर गडप होते तर कधी रस्त्याच्यावर अर्धा फूट दिसते. आज मात्र या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ड्रेनेज लाईन साफ केले परंतु त्यातील गाळ,घाण चेंबरच्या बाजूला टाकली. हा प्रकार एका सामाजिक कार्यकर्त्याने उघडकीस आणला.
शहरातील 70 फूट रोड भारतरत्न इंदिरा नगर भागात अशा प्रकारे घाण टाकल्याचा फोटो अमितकुमार अजनाळकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
“स्मार्ट” सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात ज्यावेळी सफाई कामगार मुख्य रस्त्यावरील किंवा अंतर्गत रस्त्यावरील ड्रेनेज लाईनच्या सफाईचे काम करतात, त्यावेळी त्या लाईन मधून निघालेली माती आणि कचरा गोळा करून घंटा गाड्यांमार्फत करून त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे असते.
मात्र घाण न उचलता थेट रस्त्यावर ड्रेनेज लाईनच्या झाकणा शेजारीच टाकून जातात. त्यानंतर काही दिवसांनी तो कचरा सुकतो आणि त्याची माती पुन्हा आसपासच्या परिसरात रस्त्याच्या कडेने पसरते.
या कारणामुळे सोलापूर “स्मार्ट” सिटीमध्ये रस्त्यावरील धूळ आणि मातीचे प्रमाण वाढतच चालले आहे असंही मत त्यांनी व्यक्त केले आहे.
जर सफाई कर्मचाऱ्यांना नागरिकांपैकी कोणी ती ड्रेनेज चेंबर मधील ओली घाण रस्त्यावर टाकण्याबद्दल विचारले असता ते कर्मचारी अशा अविर्भावात त्या व्यक्तीकडे बघतात की जणू त्यांना त्यांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून रस्त्याच्या कडेलाच चेंबर मधील घाण टाकण्याची परवानगी मिळालेली आहे.
रस्त्याच्या कडेला असणारी माती कामगारांमार्फत काढण्यासाठी फक्त एक महिना जरी लावला आणि चेंबर साफ झाल्यावर निघालेली घाण घंटा गाड्यांमध्ये भरून डम्पिंग यार्डात नियमितपणे पोचवत राहिले तर सोलापूर शहर आपोआपच धुळमुक्त होईल आणि खऱ्या अर्थाने स्मार्ट होईल.
फक्त यासाठी सोलापूर महानगरपालिकेत पोहोचणारा नगरसेवक खऱ्या अर्थाने सोलापूर शहराचा विचार करणारा हवा.
अमितकुमार अजनाळकर
सोलापूरकर