हेलिकॉप्टरने आलेल्या पालकमंत्र्यांची कोरोना रुग्णांना भेट

Big9news Network

जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आधीच सांगितल्याप्रमाणे त्यांची दर शुक्रवारी धावती भेट असते. त्यात प्रशासकीय आढावा घेऊन काही सूचना करून परत निघतात.

आज शुक्रवारी सिव्हील हॉस्पिटल मधील कोविड सेंटरला त्यांनी भेट दिली. यावेळी अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रदीप ढेले, सिव्हिलच्या कोविड समन्वयक डॉक्टर अग्रजा चिटणीस,तहसीलदार जयवंत पाटील यांची उपस्थिती होती.
त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री भरणे यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालय येथे प्रत्यक्ष भेट देऊन कोविड वॉर्डची पाहणी केली.

कोविड वॉर्डमधील रूग्णांची केली विचारपूस –

पालकमंत्री श्री. भरणे यांनी आज श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालय येथील कोविड वॉर्डची पाहणी केली. तब्बेत कशी आहे…त्रास काय काय होतोय…आता बरे वाटतंय …सोयीसुविधा मिळतात का….याची माहिती पालकमंत्र्यांनी स्वत: रूग्णांकडून विचारून घेतली. त्रास जास्त जाणवत नाही, खोकला, सर्दी अशी सौम्य लक्षण असल्याचे रूग्णांनी सांगितले.

वैयक्तिकरित्या पालकमंत्र्यांनी कोरोना वॉर्डात जावून रूग्णांची विचारपूस केली. या वॉर्डात एकूण 56 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण असून यातील 36 रूग्ण हे वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आहेत.

या दौऱ्याच्या निमित्ताने नवीन कोणते कडक निर्बंध लागू होतात की काय.? अशी चर्चा व्यापारी वर्गांमध्ये मोठ्या प्रमाणावर होती. परंतु पालक मंत्री यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना लॉकडाऊन होणार नसल्याचे पुन्हा एकदा सांगितले. कोरोना नियमांचे पालन करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.