या वर्षी शुक्रवार, 23 जुलै 2021 या दिवशी गुरुपौर्णिमा असून त्या निमित्ताने गुरुमंत्राविषयी माहिती देणारा लेख
गुरुपौर्णिमा लेखांक : २
*‘गुरुमंत्र गुप्त ठेवावा’ असे का म्हणतात ?*
गुरूंनी एखाद्या साधकास गुरुमंत्र दिलेला असतो. या गुरुमंत्राद्वारे त्याने त्याची उपासना करायची असते. मात्र काही वेळेस हा मंत्राबद्दल गुप्तता बाळगावी असे म्हटले जाते. त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
१. एखाद्या साधकाची आवश्यकता लक्षात घेऊन गुरु त्याला एखादा मंत्र सांगतात, तेव्हा त्यात त्यांची शक्ति असते. तोच मंत्र त्या साधकाने दुसर्याला सांगितला, तर सांगणार्या साधकात शक्ति नसल्याने त्या मंत्राने साधना केली तरी दुसर्याला त्याचा फायदा होत नाही. तसे झाले तर त्या दुसर्याचा व त्याचा अनुभव ऐकून पहिल्या साधकाचा बुद्धिभ्रंश होऊन तो (पहिला साधकही) साधना बंद करण्याचा संभव असतो.
२. एखादी गोष्ट गुप्त ठेवायची म्हटली की, तिची आठवण सातत्याने होते. या नियमानुसार मंत्र गुप्त ठेवायचा म्हटले की मंत्रसाधना जास्त होते.
३. प्रत्येकाचा मंत्र निराळा असल्याने एकाचा मंत्र काय आहे, हे दुसर्याला कळल्याने त्याचा त्याला काहीएक फायदा होत नाही.
४. गुरुमंत्र म्हणजे नुसता नामजप नसून मंत्र असल्यास, अयोग्य रीतीने मंत्रोच्चार झाला तर त्यामुळे तो मंत्र म्हणणार्या दुसर्याचे नुकसानही होऊ शकते. (‘अध्यात्मशास्त्र : प्रकरण १० – मंत्रयोग, मुद्दा – उच्चार व महत्त्व’ पहा.)
‘गुरुमंत्र गुप्त ठेवावा’, हा नियम अभ्यासू साधक व गुरुबंधूंशी बोलतांना पाळण्याची गरज नाही. त्यांच्याबरोबर चर्चा करतांना मंत्र किंवा कोणतीही साधना गुप्त ठेवण्याची आवश्यकता नाही; कारण चर्चेतून सर्वांनाच काहीतरी शिकता येते व काही धोकाही नसतो.
रामानुजांना गोष्ठीपूर्णांकडून ‘ॐ नमो नारायणाय’ हा गुरुमंत्र मिळाला. हा मंत्र गुप्त ठेवण्याची गोष्ठीपूर्णांनी त्यांना आज्ञा केली. ‘या मंत्राने मुक्ति मिळते’ असे गुरूंनी सांगितल्यावर ते नजीकच्या एका मंदिराच्या शिखरावर चढून मोठ्याने तो मंत्र म्हणू लागले. अनेकांच्या कानावर तो मंत्र पडू लागला. ही गोष्ट कळल्यावर गोष्ठीपूर्ण अतिशय रागावले व रामानुजांना म्हणाले, ‘‘तू गुर्वाज्ञेचे पालन केले नाहीस. तुला नरकात खितपत पडावे लागेल.’’ यावर रामानुज उत्तरले, ‘‘आपल्या कृपेने हे सर्व स्त्री-पुरुष जर मुक्ति पावणार असतील, तर मी नरकात आनंदाने जायला तयार आहे.’’ हे ऐकून गोष्ठीपूर्ण प्रसन्न होऊन उद्गारले, ‘‘आजपासून विशिष्टाद्वैतवाद हा ‘रामानुजदर्शन’ म्हणून तुझ्या नावाने ओळखला जाईल.’’
संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘गुरुकृपायोग’
संकलक : हिरालाल तिवारी
सनातन संस्था, सोलापूर